सर्वात वर

ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान

पुणे – महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज पुणे समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आला.एक लक्ष रुपये ,मानपत्र, शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मिळलेला हा पुरस्कार मी ज्या बहुजन समाजातून येतो त्या बहुजन समाजातून मिळाला असून त्यांचा मला मनस्वी आनंद आहे. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगीतले. ज्यांनी किडनी बदलली आहे त्यांना बदलल्यानंतर १० ते बारा वर्षाचे आयुष्य मिळते मात्र मला माझ्या आईने दिलेली किडनी आणि आजवर केलेल्या कामातून मिळालेल्या आशीर्वादातून मला २५ वर्षाहून अधिक आयुष्य लाभले. या कामाबद्दल मला आज महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझ्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना देतो असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सुख दु:खात अडचणीत काम करण्याच बळ मिळते ते उर्जा केंद्र महात्मा फुले वाडा आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो नागरिकांना नजर पुन्हा एकदा मिळवून दिली. त्याप्रमाणे त्या काळात बहुजन समाजाला दृष्टी देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. केवळ नजर असून तुम्ही समाजासाठी काही करू शकत नसाल तर त्या नजरेचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते असे ते म्हणाले, ते म्हणाले कि, देशातील मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. त्यानंतर जालना येथील पहिल्या सभेत मंडल आयोग लागू करण्याची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन  मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करून या मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून दिला. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पुण्याच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगीतले.

इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी उभारण्यात आलेल्या महाज्योतीसाठी तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी,  मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आम्ही भरीव निधीची मागणी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुले व मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, इतर मगासवर्गीय समाजातील बांधवाना घरकुल मिळावं यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना यासह विविध योजनांची मागणी आपण केलेली आहे. तसेच नोकरी मध्ये असलेला मागासवर्गीय समाजाचा अनुशेष भरून काढण्यात यावा अशी आपली मागणी आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, रविंद्र पवार, शिवाजीराव नलावडे, डॉ.विठ्ठल लहाने, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डी.वाय.पाटीलचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, डॉ.शेफाली भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे,मनीषा लडकत, प्रा.गौतम बेंगाळे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते.कोरोनाचे सर्व नियम पालन करत हा सोहळा पार पडला