सर्वात वर

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

बातमीच्या वर

२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी,महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

पुणे –अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना देण्यात येणार असल्याची माहितीअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी दिली आहे.सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी केलेलं हे कार्य केवळ राज्यातील नाही तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आणि येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. नेत्र शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक तंत्रात त्यांनी प्रभुत्व मिळवून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील ग्रामीण भागातील गोर गरिब आणि आदिवासी भागात नेत्ररोग्यांना शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टी प्राप्त करून दिली. आजवर दीड लाखांहून अधिक शस्त्रक्रिया व ५० लाखांहून अधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी इतिहास घडविलेला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागात काम करतांना अनेक तज्ञ डॉक्टर त्यांनी घडविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि आपल्या अफाट सामाजिक कार्यासाठी त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, माजी खासदार समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस प्रा.हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, डॉ.कैलास कमोद, जी.जी.चव्हाण यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता नियमांचे पालन करत उपस्थित राहणार आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार,  माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता फुले प्रेमी, समता सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ  यांनी केले आहे

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली