सर्वात वर

ब्रीचकॅण्डी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उत्तरमहाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा

ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण  

नाशिक-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था संघटनांनी पुढे यायला हवे असे आवाहन आपण करत असून त्यादृष्टीने नाशिकमधील डाॅ .विजय पवार, डाॅ. स्वप्निल इंगळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या अनुभवातुन ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरच्या (Covid Care Center) निर्मिती केली आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील अतिशय उत्तम कोविड सेंटर नाशिकमध्ये उपलब्ध झाले झाले असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन दिलासा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक शहरात मुंबई नाका परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे (Covid Care Center) लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, हंसराज वडघुले, हॉस्पिटलचे संचालक डाॅ .विजय पवार, डाॅ. स्वप्निल इंगळे, नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भंडारी यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटर (Covid Care Center) या अतिशय चांगल्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अत्यंत कमी वेळात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करण्यास वाहून घेणारे हॉस्पिटल आहे. जो पर्यंत कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर कोरोना विरुद्ध लढा देण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, कोरोनाने मोठयाप्रमाणात हातपाय पसरविण्यास प्रारंभ केल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यास अनेक मदतीचे हात पुढे आलेत. अनेकांनी विविध मार्गाने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यात डाॅ. पवार आणि डाॅ. इंगळे ३०० बेड्सचे सेंटर उभारून कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

रुग्णांना मिळणार या सुविधा…

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असतांना त्या तुलनेत बेड्स अपुरे पडत असल्याचे आणि अनेकांना त्यामुळे प्राणही गमवावे लागल्याचें निदर्शनास आल्यानंतर रुग्णांना दिलासा देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईनाका परिसरात उत्तर महाराष्ट्रातील सर्व  सुविधायुक्त असे भव्य ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. एक लाख २० हजार चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेच्या बांधकामात साकारलेल्या  या कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात १०० बेड्सचा लोकार्पण आज करण्यात आले आहे.

या हॉस्पिटलमध्ये  ३५ आयसीयू  तर ६५ ओटू बेड  असतील. दुसऱ्या टप्प्यात रुग्णांसाठी आणखी २०० बेड्स उपलब्ध होणार असून यात ६५ आयसीयू तर १३५ ओटू बेड्स असतील. तसेच या कोविड केअर सेंटरमध्ये १५ व्हेंटिलेटर, ६० बायपॅप तसेच २५ ओटू माॅनिटर उपलब्ध असणार आहे.Attachments area