सर्वात वर

विवाह पूर्व समुपदेशन अत्यंत महत्वाचे 

सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

Pre-Marital Counseling

आज पर्यंतच्या आपल्या लेखांमध्ये आपण वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या विविध समस्या आणि त्यामध्ये समुपदेशन ने कशा  प्रकारे मार्ग काढायला मदत होते यावर विचारमंथन केलें. अनेक प्रकरणामध्ये समुपदेशन खूप प्रभावी ठरते आणि वैवाहिक आयुष्य पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होते. परंतु अनेकदा असे हि लक्षात येतें की, जर समस्या टोकाला गेलेल्या असतील, नात्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया, पोलीस स्टेशन तक्रारी या गोष्टी घडून गेल्या असतील तर असे नातेसंबंध समुपदेशन ने पूर्ववत करणे आव्हानात्मक असते. त्याही पलीकडे जरी ते पूर्ववत झालेच तर तोपर्यंत भोगावा लागलेला मनस्ताप, मानहानी, आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठेला बसलेला धक्का, अपत्यं असल्यास त्यांचेवर झालेला भावनिक आघात भरून काढणे कठीण जाते. 

वैवाहिक जीवनात समस्या आल्यावरच पती पत्नीने समुपदेशन चा आधार घ्यावा, किंवा कोर्ट कचेरी ची वेळ आल्यावरच समुपदेशन घ्यावे असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. आपली सध्या प्रचलित असलेली  विवाह संस्था, त्याचे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अनन्य साधारण महत्व, आपली विवाह पद्धती आणि प्रत्येकाच्या वैवाहिक जीवनाच्या संकल्पना, त्यामधून असलेल्या अपेक्षा या मध्ये फक्त पती पत्नी महत्वाचे नसून, दोन्ही कडील कुटुंब आणि त्यांचा वैचारिक समन्वय अतिशय महत्वाचा असतो. ठरवून केलेले,सर्वांच्या सहमतीने, रीतसर केलेली  लग्न देखील सर्रास तुटताना दिसतात.अश्याप्रकारे व्यवस्थित, पद्धतशीर, अमाप पैसा खर्च करून, लग्ना आधीची सगळी बोलणी करून, सर्व नातेसंबंध जुळवून, मुलगा – मुलगी त्यांचं शिक्षण, कला गुण, आवडीनिवडी, गुणवत्ता, आर्थिक परिस्तिथी उद्योग व्यवसाय पडताळून लग्न केलेले असले तरी कालांतराने  त्यांच्या आयुष्यात त्यांना घटस्फोट पर्यंत का जावे लागते, किंवा कायद्याचा आधार का घ्यावा लागतो याचे निरीक्षण केल्यावर लक्षात येतें की लग्न जमवताना अथवा लग्न जमल्यापासून ते होईपर्यंत आपल्याकडून अनेक प्रकारची तयारी केली जाते, ऐकून एक गोष्टीचे व्यवस्थित नियोजन केलें जाते आणि सोहळा म्हणून आपण तो उत्कृष्ट रित्या पार पाडतो देखील. म्हणजेच लग्न ठरविण्यापासून ते होई पर्यंत आपण फक्त या एक दिवसाच्या कार्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. 

लग्नानंतर जगण्याचे एकत्रित आयुष्य, त्याबद्दल दोन्ही कुटुंबातील लोकांचा विचार, पती पत्नी यांची  विवाहानंतर बदलणाऱ्या आयुष्याला सामोरं जाण्याची ची मानसिक तयारी त्यासाठी लग्न आधीपासून केलेले प्रयत्न खूप महत्वाचे असतात. लग्नानंतर देखील दोन्ही कुटुंबातील प्रत्येकाची भूमिका, दृष्टीकोन, घरातील प्रत्येक सदस्यांची  पूर्वी पासून चालत आलेली पार्श्ववभूमी आणि त्यातूनच निर्माण झालेली त्याची वैयक्तिक मानसिकता, सदस्याचा स्वभाव, शिक्षण, विचार, संस्कार यावर पती पत्नीचे वैवाहिक आयुष्य अवलंबून असते.

लग्नाआधी मुलगा मुलगी यांनी आपल्या लग्नानंतर च्या आयुष्याबद्दल ज्या काही कल्पना केलेल्या असतात किंवा जी काही स्वप्न पाहिलेली असतात त्यात ते एकमेकांना अनुरूप असून सुद्धा नंतर त्यांच्यात वाद का होतात? लग्नाआधी दोन्ही कुटुंबीय एकमेकांना अनेकदा भेटून, बोलून, चर्चा करून देखील लग्न आधी एकमेकांना प्रचंड आदर देणारे नातेवाईक लग्नानंतर एकमेकांना डायरेक्ट कोर्टात खेचायची, मारहाण करायची भाषा का करतात?  यावर एकच उत्तर आहे की आपण लग्न म्हणजे फक्त एक दिवसाचा सोहळा समजून तयारी करतो की लग्न म्हणजे आयुष्यभर दोन कुटुंबातील एकमेकांसोबत  चालण्याची वाट म्हणून दूरदृष्टी ने प्रयत्न करतो.अनेक वैवाहिक समस्यांमध्ये पती अथवा पत्नी दोघांकडून हेच ऐकायला मिळते की आम्हाला लग्ना आधी अमुक माहितीच नव्हतं, असं होत हे लग्नानंतर समजलं, आम्ही असं समजून लग्न केल होत, आम्हाला असं सांगण्यात आलं होत, आमच्यापासून हे लपवलं होत. 

यामध्ये अनेक गोष्टी जशा की दोघांचेही शिक्षण, करियर, नौकरी व्यवसाय बद्दल माहिती, उत्पन्न, मित्र मंडळी, सवयी, व्यसन, लग्ना आधीचे प्रेमप्रकरण, स्थावर मालमत्ता, स्वतः च घर, पती पत्नी चे राहण्याचे ठिकाण, आजारपण, घरातील इतर लोकांबाबतीतील काही दडून ठेवलेले  रहस्य, इतर सदस्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या सवयी इतक्या गोष्टींचा समावेश असतो. यातील कोणतीही गोष्ट लग्नानंतर धक्कादायक पद्धतीने समोर आली तर कोणीही त्याठिकाणी डगमगणारच.  

पती पत्नी च्या लग्नावर वरील सर्व गोष्टींचा पडणारा प्रभाव आणि त्याला हाताळण्याची त्यांची क्षमता याचा ताळमेळ बसला तर ठीक अन्यथा वैवाहिक नात्यात तणाव यायला सुरुवात होते. लग्नानंतर मुलीचं आयुष्य सुखी समाधानी होण्यासाठी तिच्या आईवडिलांनी सर्वतोपरी मार्गदर्शन, सूचना केलेल्या असतात, अनेक समजुतीच्या गोष्टी सांगितलेल्या असतात,  तसेच मुलाच्या आईवडिलांनी देखील आपल्या मुलाला घडवण्यात प्रयत्नांची शर्त केलेली असते. तरी देखील आपली विवाहसंस्था कुठे कमी पडते, घरातील अनुभवी, जेष्ठ, सुज्ञ मंडळी देखील कुठे चुकतात यावर विचार करून ते समजून घेऊन त्यावर काम करणे आवश्यक आहे. 

त्यासाठी लग्नापूर्वीच आपली मानसिकता तयार करणे यासाठी समुपदेशन (Pre-Marital Counseling) खूप महत्वाचे ठरते. वैवाहिक आयुष्यात अनपेक्षित पणे कोणतीही समस्या आली, किंवा पूर्वकल्पना नसताना एखादी घटना घडली, आपण विचार केलेल्या आणि प्रत्यक्षात असलेल्या आयुष्यात जर काही तफावत जाणवली, किंवा लग्नाआधीचे जाणवलेले एकमेकांबद्दल आलेले चांगले अनुभव आता नकारात्मक वाटू लागले तर त्याठिकाणी आपण या परिस्थिती ला कस सामोरं जावं, काय भूमिका असावी, कोणते निर्णय घ्यावेत यासाठी विवाहपूर्व घेतलेले समुपदेशन (Pre-Marital Counseling) मदत करू शकते.

आपण लग्नाआधी जी काही पूर्वतयारी मोठया उत्साहाने करतो, घरातला प्रत्येक जण अत्यंत आनंदाने त्यात सहभागी होत असतो. त्यावेळेस छोट्या तली छोटीशी गोष्ट काळजीपूर्वक करणे, कुठेही काही कमतरता राहणार नाही याच नियोजन करणे याकडे आपले लक्ष असते. पण नव्याने सुरुवात होणाऱ्या आयुष्यासाठी पती पत्नींना मानसिक दृष्टीने तयार करतांना कोणीही दिसत नाही. लग्नाचं वय झालं, लहानपणापासून संस्कार केलें, शिक्षण दिले, नौकरी लागली, चांगल्या वाईट गोष्टी समजून सांगितल्या आणि थाटामाटात लग्न झाले की आता उभ्या आयुष्यात काहीच अघटित न घडता आपल्या स्वप्नात पाहिल्यासारखं वैवाहिक आयुष्य शेवटपर्यंत चालेल अशी मनोधारणा नव विवाहितांची असते. 

लग्नानंतर जेव्हा कोणत्याही समस्या येऊ लागतात, आपल्या सहनशक्ती ची कसौटी लागते तेव्हा लक्षात येतें की आपण तर यावर आधी विचारच केला नव्हता. आयुष्यात हे असे पण असते का ? असे कसे घडले ? हे माझ्याच बाबतीत घडलं का ? अश्या वेळी आपल्या वैवाहिक आयुष्याची तुलना इतरांसोबत करून आपण स्वतः आपलं दुःख वाढवून घेत असतो. काय चुकतंय हे शोधण्यापेक्षा कोण चुकतंय यावर लक्ष दिले जाते आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊन मन कलुषित व्हायला सुरुवात होते. 

विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) मध्ये पती आणि पत्नी यांना वैयक्तिक तसेच एकत्रित मार्गदर्शन करून आपले विचार, वागणूक, सवयी याबाबत लग्नानंतर लवचिकता आणणे, नवीन जे काही समोर येईल ते सकारात्मक दृष्टीने घेऊन, तडजोड करून साध्य करता येण्यासारखं असेल तर करणे, कोणतीही, कशीही नकारात्मक, अप्रिय  परिस्थिती समोर आली तरी मनोधैर्य खचून न देता ती कुशलतेने हाताळणे याला मदत होते. विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) मध्ये वैवाहिक जीवनातील त्रासदायक होऊ शकणाऱ्या अनेक छोटया छोटया गोष्टी, मनाविरुद्ध घडू शकणाऱ्य घटना, कुटुंबातील माणसं त्यांचे गुण दोष स्वीकारणे यावर सविस्तर चर्चा केली जाते. 

अनेक ठिकाणी लग्ना आधी एकमेकांना न सांगितलेल्या गोष्टी, लपवलेली माहिती, गृहीत धरलेल्या बाबी नवविवाहितांना अथवा कुटुंबियांना नंतर समजते तेव्हा खूप मोठा धक्का बसतो आणि त्यातून सावरणे कठीण होते.

लग्नानंतर कोणतीही अनपेक्षित आणि वाईट परिस्थिती ओढवली तरी ती सहन करण्याची शक्ती नसल्याने संसार यशस्वी करण्याची मानसिकता राहत नाही त्यातून लग्नाच्या आधी यावर कधीच विचार केला नसल्याने, पती पत्नी ना स्वतः हे प्रश्न सोडवता येत नाहीत, परिणामी ते आपापसातील छोटया मोठया गोष्टी, प्रश्न, समस्या कुटुंबातील लोकांना सांगत सुटतात. अश्यावेळी प्रत्येक जण प्रत्येकाच्या वैचारिक कुवतीनुसार त्यावर चर्चा करीत राहतो आणि परिस्थिती अजूनच बिघडत चालते. त्यामुळे विवाहापूर्वीच जर आपण वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या  सगळ्या शक्यता लक्षात घेणेसाठी, त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी योग्य मार्गदर्शन घेतले (Pre-Marital Counseling) तर आपली मानसिकता त्या दृष्टीने तयार होण्यासाठी मदत होईल.

लग्नाआधी पती पत्नी नी सर्वांगीण विचार करूनच एकमेकांना होकार दिलेला असतो तरी देखील लग्न संस्था विस्कळीत का होत आहेत?  यावर विचार केला असता असे लक्षात येते की यामध्ये फक्त नवरा बायकोच दोषी नसतात तर घरातील प्रत्येक सदस्य कोणत्या न कोणत्या मार्गाने कळत नकळत या नुकसानीला कारणीभूत झालेला असतो. ज्यावेळी परिस्थिती पूर्ण आवाक्याबाहेर जाते तेव्हा आपल्या लक्षात येते की किती छोटया किरकोळ कारणांवरून, वेळेत योग्य सल्ला न मिळाल्यामुळे, वेळेत निर्णय न घेतल्यामुळे आपलं वैवाहिक आयुष्य संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. काय धरायचं, काय सोडायचं, किती ताणायच, किती बोलायचं कुठे बोलायचं हे जर लग्नाच्या आधीपासून अंगिकारल तर नक्कीच पुढे पश्चाताप करायची वेळ येणार नाही.

विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) आपल्याला वैवाहिक आयुष्याकडे सर्वांगीण दृष्टीकोनातून पाहायला, व्यक्ती ओळखायला, कुटुंबातील इतर लोकांचे हेतू लक्षात घ्यायला देखील मदत करते. वैवाहिक आयुष्य सुरु झाल्यावर संसारातील सर्व चांगल्या वाईट घटना कश्या स्वीकाराव्या याच आकलन होण्यासाठी मदत होते. लग्नानंतर आपण पती अथवा पत्नी हि एकच भूमिका न करता आपल्याशी अनेक नवे नाते लग्नानंतर जोडले जातात आणि त्या नात्यांना अधिकाधिक मजबूत करणे, स्वतः सोबतच कुटुंबाचा विकास करणे यावर समुपदेशन मध्ये सल्ला मसलत केली जाऊ शकते. 

विवाहाच्या आधी फक्त वरवरच्या गोष्टींकडे आकर्षित होऊन घेतलेला निर्णय आपल्याला नंतर पच्छाताप करण्याची वेळ आणतो. त्यामुळेच विवाहाआधीच इतर सर्व तयारी करण्यासोबतच आपली मानसिक तयारी करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

लग्न ठरण्या आधीचा, अथवा लग्न ठरून ते होइ पर्यंतचा कालावधी प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा अनुभव असतो. त्या कालावधीत प्रत्येकाच्या मनात आनंदाला उधाण आलेले असते. परंतु याबरोबरच भावी पती आणि पत्नी दोघांनी आपली वैयक्तिक आयुष्यातील ध्येय, धोरण, आपले करियर प्लॅन्स, महत्वकांक्षा, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिगत स्वतः कडून असलेल्या अपेक्षा याची पूर्तता लग्नानंतर कधी कशी कोणाच्या मदतीने आणि कितपत होऊ शकणार आहे ? ते होऊ शकले नाही तर आपली भूमिका काय असणार आहे ?

आपण ठरवल्यानुसार अथवा आपल्या अपेक्षा नुसार वैवाहिक आयुष्य प्रत्यक्षात नसेल तर आपण त्यासाठी कितपत तयार आहोत ? कोणत्या मर्यादेपर्यंत आपण तडजोड करू शकतो ? आपल्या वैवाहिक आयुष्यात कोणत्याही अनपेक्षित घटना कालांतराने घडल्यास आपल्या कुटुंबातील लोकांची त्यात नेमकी काय भूमिका असणार आहे ? आपल्या संसाराची, त्यामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आपण अत्यंत विश्वासू अश्या कोणत्या व्यक्ती ला सांगणार आहोत ? आपल्याला अतिशय अचूक सल्ला अश्या बिकट परिस्थिती मध्ये कोण नातेवाईक, मित्र मैत्रीण देणारा आहे याचा विचार देखील विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) मध्ये केला जातो.

आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाल्यावर दोन्ही कडील मंडळींची काय गरज, अपेक्षा आपल्याकडून असणार आहेत ? आपले कुटुंबीय आपल्याला कोणत्या परिस्थिती मध्ये किती आणि कशी  साथ शेवटपर्यंत देऊ शकतात ? आपले प्लस पॉईंट्स तसेच आपले व्यक्तिगत मायनस पॉईंट्स काय आहेत ? आपल्या भावनांवर, रागावर आपले स्वतः चे किती नियंत्रण आहे किंवा असावे ? आपण कोणत्या स्वरूपाची जोखीम पत्करू शकतो आणि कितपत ? यासगळ्या विषयावर विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) खूप मदत करते.

आपल्या वैवाहिक जीवनात किती वर्षांनी कोणत्या स्वरूपाच्या समस्या येतील, त्या कितपत गंभीर असतील, त्यातून आपण कसा मार्ग काढणार, आपला विवाह टिकविण्याकडे आपला कल असेल की तोडण्याकडे या दृष्टीने कोणीही लग्नाआधी नकारात्मक विचार केलेला नसतो, आणि तसा करणे योग्य हि नाही. परंतु समस्या निर्माण झाल्यावर आपण मानसिक, शारीरिक, भावनिक दृष्टीने बरेचदा कमकुवत झालेलो असतो. अश्या प्रसंगी आपले विचार आणि त्यातून घेतलेले  निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन मार्फत आपण वैवाहिक जीवनाविषयी चे कायदे त्यांचे स्वरूप आणि अंमलबजावणी यावर देखील मार्गदर्शन नक्कीच घ्यावे. विवाहपूर्व समुपदेशन फक्त पती पत्नी साठीच उपयुक्त नसून दोन्ही कडील कुटुंबातील सदस्य देखील यामध्ये (Pre-Marital Counseling) सहभागी होऊ शकतात. 

पती पत्नी ना वेळोवेळी सल्ले देणे, मार्गदर्शन करणे, त्यांच्या चुकांचा उहापोह करणे, त्यांचेकडून सर्व आघाड्यावर अपेक्षा करणे, त्यांच्या संदर्भातील चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा सार्वत्रिक करणे यामध्ये अनेकदा घरातील सदस्य सहभागी असतात. अनेक जोडपी केवळ घरगुती राजकारणामुळे आणि इतरांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कट कारस्थान मुळे विभक्त होताना दिसतात.

विवाहित मुलींनी, महिलांनी तसेच विवाहित पुरुषांनी एकमेकांच्या बाबतीतील कोणत्या गोष्टी आपापल्या आई वडिलांना, बहीण भावंडाना सांगाव्यात, कोणत्या सांगू नाहीत, आपल्या प्रापंचिक आयुष्यात कोणाला किती ढवळाढवळ करू द्यावी, हि पथ्य लग्नाच्या आधीच माहिती असतील तर पुढे त्याचा त्रास नक्कीच होत नाही. विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) मध्ये या बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी भर दिला जातो.  

छोटया कुटुंबातून मोठया एकत्रित कुटुंबात नांदायला जाणाऱ्या मुली, शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने लग्नाआधी भिन्न बॅकग्राऊंड असलेल्या मुलं मुली, वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक, आर्थिक, वैचारिक जडणघडण असलेल्या भिन्न जीवनशैली मधील कुटुंबातील मुलं मुली यांना  विवाह ठरल्यावर विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) नक्कीच मदत करू शकते. तुमचं वैवाहिक आयुष्य यशस्वी करायला लग्नाआधी ज्या अनेक आघाड्यावर तुम्ही प्रयत्न करीत असता त्यात विवाहपूर्व समुपदेशन (Pre-Marital Counseling) नक्कीच मोलाचे सहकार्य करू शकते.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे

संपर्क. 9834114342 9766863443
(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)