सर्वात वर

मॅजिक बॉक्स

शीतल पराग जोशी 

तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही दुपारी हे मॅजिक बॉक्स (Magic Box) करून फ्रिजमध्ये ठेवू शकतात. आणि 1 तास आधी काढून नंतर तळून देऊ शकतात. चला मग करू या.


साहित्य: (Magic Box) 2 वाटी कणिक किंवा मैदा, 1 चमचा रवा, 4 बटाटे, 2 सिमला मिरची, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 गाजर, 1 वाटी मटार, 6 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या, 1 इंच आले, 2 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद,1 टीस्पून गरम मसाला,  2 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, तेल, मीठ, सोडा, कोथिंबीर

कृती: कणिक किंवा मैदा घेऊन त्यात तेल आणि मीठ टाकून थोडे पाणी घालत कणिक घट्ट भिजवून घ्यावी. कणिक घेणार असाल तर त्यात थोडा रवा  आणि सोडा घाला. मैदा घेतला तर जास्त क्रिस्पि होतात. असा हा गोळा झाकून 15 मिनीट ठेवून द्या.


आता सारण बनवू या.(Magic Box)

एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात  कांदा, मिरची तुकडे टाकून चांगले परतवा. नंतर त्यात आले लसूण पेस्ट घाला. गाजर, सिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरून घाला. मटार असले तर थोडे क्रश करून घाला. नसले तर टाकू नका. त्यात तिखट, हळद, गरम मसाला,चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर घालून चांगले परतवा. नंतर त्यात स्मॅश करून बटाटा घालावा. मीठ आणि कोथिंबीर घालावी. हे सारण डिशमध्ये काढून थंड होऊ द्यावे. कढईत तेल घेऊन ते तापण्यास ठेवावे. नंतर एक कणकेचा अथवा मैद्याचा गोळा घेऊन थोडे पीठ लावून पोळी लाटावी. त्याच्या कडा कापून घ्याव्यात. मधल्या भागाचे दोन भाग करावेत. समोसा पट्टी असते त्याप्रमाणे हवे.

एका वाटीत मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करावी. ह्यातील एक पट्टी घेऊन त्याला ही पेस्ट लावावी. नंतर त्यावर एका बाजूला ही बनवलेली भाजी घालावी. आणि दुसरे टोक घेऊन ते बंद करून टाकावे. काटा चमचा घेऊन त्या कडा दाबून घ्याव्या. थोडक्यात करंजी करतो त्याप्रमाणे करावे.  फक्त इथे गोल पुरी नसून लांबट पट्टी आहे. तेल तापले की त्यात हे मॅजिक बॉक्स लालसर तळून घ्यावेत. टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करावे. पाहुणे तर खुश होतीलच. पण तुम्हाला पण नवीन काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. तुम्हाला कणिक वापरायची तर कणिक वापरा नाहीतर मैदा वापरा. जास्त प्रमाणात करायचे असतील हे सगळे प्रमाण वाढवून करू शकतात. चला मग करा लवकर.


टीप:  मी इथे देत असलेल्या रेसईपी आधी स्वतः करून बघितलेल्या आहेत. आणि तुम्ही तुमच्या प्रमाणे यात बदल करू शकतात. म्हणजे जास्त तिखट खात नसाल तर तिखटाचं प्रमाण कमी करा.(Magic Box)

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२