सर्वात वर

मिसळ पाव

शीतल पराग जोशी 
मिसळ (Misal Paav)अत्यंत फेमस असा हा पदार्थ आहे. नासिकची मिसळ ((Misal Paav) तर खूप फेमस आहे. लाल रस्सा, काळा रस्सा, हिरवा रस्सा असे अनेक मिसळीचे प्रकार आहेत. नुसते नाव वाचुनच तोंडाला पाणी सुटले ना. चला मग करून बघू.

साहित्य: १/२ किलो उसळ, 4 कांदे, 15 लसूण पाकळ्या, 1 खोबऱ्याची वाटी, 2 इंच आले, 1 वाटी पोहे, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून हिंग, 1 चमचा डाळीचे पीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जीरे, 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, फरसाण (भावनगरी शेव, गाठी, पापडी) , उडीद पापड, दही,पाव,कोथिंबीर,तेल, मीठ

कृती: एक कांदा घेऊन तो संबंध गॅसवर भाजावा. नंतर खोबऱ्याची वाटी पण गॅसवर भाजून घ्यावी. नंतर हे ताटलीत काढून गार करून घ्यावे.त्याचे काप करावेत. नंतर यात लसूण, आले, गरम मसाला, तिखट, कांदा लसूण मसाला, जिरे, धने पावडर घालून मिक्सरला थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. हा झाला आपला रस्सा मसाला तयार. आता उसळ करून घेऊ. एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे. त्यात जिरे घालावे. ते तडतडले की त्यात हिंग घालावा. थोडा बारीक चिरलेला कांदा आणि थोडा ठेचलेला लसूण घालावा. त्यात हळद, तिखट, मसाला घालावा. आणि उसळ घालून थोडे पाणी घालावे.उसळ छान शिजली की त्यात मीठ घालावे आणि गॅस बंद करावा.

उसळ एका बाउलमध्ये काढून घ्यावी.पोहे भिजवून ठेवावे. नंतर त्याच पॅन मध्ये परत तेल घालावे. पोह्यांवर हळद, मीठ, घालून घ्यावे. जिरे घातले की त्यात हे भिजलेले पोहे घालावे. चांगली वाफ आली की पोहे काढून घ्यावे. आता मेन रस्सा करायला घेऊ. कढईत तेल घालावे. जरा जास्त घालावे. त्यात आपण तयार केलेला वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेस्तोवर मसाला परतावा. आजूबाजूने तेल सुटायला लागले की यात 1 चमचा डाळीचे पीठ घालावे. हे सगळे खमंग परतवले की यात पाणी घालून रस्सा उकळावा. त्यात मीठ घालावे. छान लालबुंद रस्सा तयार होतो. एकीकडे कांदा, कोथिंबीर, हवे असल्यास टोमॅटो बारीक चिरून ठेवावे. फरसाण रेडी करावे.

मिसळ (Misal Paav) वाढणे हीच खरी टॅक्ट आहे. दह्याची वाटी तयार ठेवावी.  उडीद पापड तळून घ्यावा. एका खोल प्लेटमध्ये आधी थोडे पोहे घालावे. मग त्यावर उसळ घालावी. नंतर फरसाण घालावे. त्यावर मग हा रस्सा घालावा. वरून कांदा, कोथिंबीर घालून सजवावे. एक मोठी प्लेट घेऊन त्यात दह्याची वाटी, पापड, पाव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आणि लिंबाची फोड ठेवावी. आणि उसळीची प्लेट ठेवून गरमागरम मिसळ सर्व्ह करावी. वाव अशी अप्रतिम चव लागते ना.   

एका मिसळीबरोबर (Misal Paav)आपण कितीही पाव खाऊ शकतो मग. चला मग करुन बघा टेस्टी मिसळ. काहीजण वाटाणे वापरतात. काही मिक्स उसळ वापरतात. ते तुमच्या आवडीवर आहे. रस्सा जास्त हवा असल्यास तुम्ही कांदा, खोबऱ्याचे प्रमाण वाढवू शकतात. चला करा मग मिसळ आणि मला सांगा कशी झाली ते.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी


संपर्क-९४२३९७०३३२