सर्वात वर

टोमॅटो पकोडे

शीतल पराग जोशी 

आपण टोमॅटोची कोशिंबीर करतो. टोमॅटो सूप करतो. इतर अनेक पदार्थात आपण टोमॅटो वापरतो. पण आज त्याची भजी किंवा पकोडे (Tomato Pakoda) करून बघू या. 

साहित्य: (Tomato Pakoda) ६ लाल टोमॅटो, 4 बटाटे, 1 कांदा, 10 लसूण पाकळ्या, 5 मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडी शेव, 2 वाटी डाळीचे पीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट,1 टीस्पून सोडा, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, मीठ, तेल

कृती: लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ, आणि बारीक शेव यांची मिक्सरला चटणी करून घ्यावी. बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावेत. एक कढई घेऊन त्यात थोडे तेल घालून त्यावर कांदा, आणि मिरचीचे तुकडे परतावे. थोडा ठेचलेला लसूण घालावा. नंतर त्यात धणे, जिरे पावडर, चाट मसाला घालावा. हळद, तिखट आणि मीठ घालून त्यावर हे स्मॅश केलेले बटाटे घालावे. चांगले एकजीव मिश्रण झाले की ताटात गार करण्यास ठेवावे. तोपर्यंत एका पातेल्यात चणा डाळीचे पीठ घेऊन त्यात किंचित हळद, ओवा, सोडा, मीठ,आणि  पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यावे. एका टोमॅटोचे दोन भाग करावेत. त्यातील बियांचा गर काढून घ्यावा.

नंतर त्यात आपण बनवलेली  हिरवी चटणी घालावी. बटाट्याचे मिश्रण घालून टोमॅटो पॅक करावा. काही टोमॅटोच्या मोठ्या जाडसर स्लाइस कापून त्यावरच चटणी आणि बटाट्याचे मिश्रण लावावे. बिया काढू नये. एक कढई घेऊन तेल तापण्यास ठेवावे. आणि हे छान भरलेले टोमॅटो आणि काही टोमॅटो स्लाइस डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात तळावे. टोमॅटो पकोडे खरपूस झाले की काढून घ्यावेत. वा वा अशी टेस्ट लागते ना भन्नाट मस्त आंबट, त्यात ती  हिरवी चटणी, बटाट्याचे मिश्रण.मस्त पकोडे तयार. पुदिना चटणी बरोबर हे टोमॅटो पकोडे (Tomato Pakoda) सर्व्ह करा. आणि सगळ्यांची वाहवा मिळवा. मग नक्की करा. 

टीप: मला अनेक जण पदार्थ करून त्याचे फोटो टाकतात. आणि घरात सगळे खुष झाले असे सांगतात. मला खूप आनंद होतो.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२