सर्वात वर

व्हेज फ्रॅंकी

शीतल पराग जोशी 

विविध प्रकारच्या भाज्या वापरून ही फ्रँकी (Veg Frankie Recipe) बनवली जाते. आपल्या घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील तसे बनवावे. उगाच अट्टाहास करू नये. मुलांना जरा वेगळा प्रकार खायला मिळतो.  तुम्ही त्यात चिज,पनीर,मेयोनिज घालू शकतात. चला मग बनवू या.


साहित्य: कणिक 1 वाटी, तेल, मीठ,5 बटाटे, 1 सिमला मिरची, 1 कांदा, अर्धी वाटी कोबी, थोडे स्वीट कॉर्न, 2 इंचआले, 7 पाकळ्या लसूण, 3 मिरच्या, कोथिंबीर, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, टोमॅटो सौस, शेजवान चटणी,चिज


फ्रॅंकी मसाला: २ टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून तिखट, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर


कृती: कणकेत थोडे मीठ आणि तेल घालून कणिक भिजवून घ्यावी. काहीजण मैदा वापरतात. पण आपण शक्यतो हेल्दी  खावे. १० मिनिट कणिक ठेवून द्यावी. नंतर याच्या पोळ्या करून घ्याव्यात. पोळ्या खूप शेकू नये. 

फ्रॅंकी मसाला: वर दिलेले साहित्य सगळे एकत्र मिक्स करून घ्यावे. यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण आणि वस्तू घेऊ शकतात. झाला आपला फ्रॅंकी मसाला तयार. असा मसाला करून फ्रिजमध्ये ठेवू शकतात.

एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. नंतर आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी. चांगले परतवले की त्यात १चमचा फ्रॅंकी मसाला घालावा. तिखट,  हळद, गरम मसाला घालावा. सिमला मिरची घालावी.उकडलेले बटाटे स्मॅश करून घालावेत. आवडत असल्यास स्वीट कॉर्न घालावेत. मीठ आणि कोथिंबीर घालावी. अशी ही भाजी तयार झाली की गार करण्यास ठेवून द्यावी. त्याचे होतील तितके लांबट रोल बनवावेत.


 एक कांदा, थोडी कोबी, कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी.  1 पोळी घेऊन ती बटर वर तव्यावर शेकून घ्यावी. नंतर ती डिशमध्ये घेऊन त्यावर टोमॅटो सौस लावावा. शेजवान चटणी लावावी. त्यावर फ्रॅंकी मसाला भुरभुरावा.तिखट नको असल्यास शेजवान चटणी घेऊ नये.आपण बनवलेले  भाजीचे रोल पोळीवर ठेवावे. त्यावर कांदा घालावा. कोबी लांबट चिरलेली घालावी. थोडी कोथिंबीर घालावी. आणि मग वरून आपल्या सर्वांचे आवडते चिझ किसून घालावे. आणि पोळीचा रोल बनवून खाण्यास द्यावा. झाली फ्रॅंकी तयार. अशी ही पौष्टिक फ्रॅंकी (Veg Frankie Recipe) कोणाला नाही आवडणार.  करून बघा मग. आपल्याकडे जर पोळ्या उरल्या असतील तर त्यापासून पण तुम्ही बनवू शकतात. मुले खुश, आपण खुश.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी


संपर्क-९४२३९७०३३२