सर्वात वर

रंगणार जनस्थानचा सप्तरंगोत्सव

२४ जून ते ३० जून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून होणार सोहळा

नाशिक : येथील ‘जनस्थान’ (Janasthan) या कलावंतांच्या व्हाट्सएप ग्रुपचा यंदा सातवा वर्धापनदिन असून तो सलग सात दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे  जनस्थान फेसबुक पेज(जनस्थान जागर कलेचा) वर ऑनलाईन साजरा होणार असल्याची माहिती ऍडमिन अभय ओझरकर यांनी दिली.

‘जनस्थान’ (Janasthan) हा नाशिकमधील कलावंतांचा ग्रुप असून त्यात नाटय,नृत्य, साहित्य, संगीत, चित्र, शिल्प या विविध कलाप्रांतातले कलावंत एकत्र आहेत.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होऊन शहरात एक वेगळेच सांस्कृतिक वातावरण तयार होते. गेल्या वर्षापासून मात्र कोरोनाच्या काळामुळे या कार्यक्रमात काहीसा खंड पडला; मात्र यावर्षी असा खंड न पडू देण्याचा निर्धार सर्वांनी घेतला आणि ऑनलाईन महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे २४ जून ते ३० जून या काळात ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम प्रस्तुत होणार आहेत.

काय काय होणार कार्यक्रम !

यात दि.२४ जूनला ‘अभंगरंग'(रंगू अभंगांच्या रंगी) होईल. दि. २५ जूनला ‘काव्यरंग’ (जनस्थानियांचे कवितावाचन), दि.२६ जूनला ‘नृत्यरंग’ (कथक/भरतनाट्यमचा आविष्कार), दि. २७ जूनला ‘पंचमरंग'(क्लासिक पंचम), दि.२८ जूनला ‘चित्र-शिल्परंग’ (संवाद चित्र-शिल्पकारांशी), दि. २९ जूनला ‘नाट्यरंग’ (वसंत कानेटकर जन्मशताब्दीनिमित्त नाट्यवाचन), दि.३० जूनला ‘लोकरंग’ (वेध मराठी लोकगीतांचा) असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.सायंकाळी ६:३० वाजता जनस्थान जागर कलेचा या पेज वर हे कार्यक्रम सर्वाना लाइव्ह बघायला मिळणार आहे.

एकूण सर्व कार्यक्रमात जनस्थानचे कलावंत सहभागी होत नाशिककरांनी त्याचा आस्वाद घ्यावा; असे आवाहन ऍडमिन ओझरकर,स्वानंद बेदरकर,विनोद राठोड यांनी केले आहे.