सर्वात वर

शिवसेना नेत्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन

 नाशिक – शिवसेना नेत्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर (Satyabhama Gadekar) यांचे आज रात्री कोरोना मुळे निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज रात्री त्यांची प्रकृती खालावली डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. रात्री १०:३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली

सत्यभामा गाडेकर या शिवसेनेतील सर्वात आक्रमक नगरसेविका म्हणून ओळखल्या जायच्या त्यांनी दोन वेळा नाशिक महानगरपालिकेत नासिकरोडकरांचे प्रतिनिधित्व केले आहे शिवसेना पक्षात काम करताना त्यांनी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख महिला आघाडी तसेच विविध पदांवर काम केलेले होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच नाशिकरोडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली अतिशय प्रामाणिक मनमिळावू व दुसऱ्यांसाठी झटणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांचा नाव लौकिक होता.

त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण गाडेकर, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

श्रद्धांजली !

नाशिक शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे दुःखद निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर असलेलं एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गाडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय गाडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ

मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.

__________________

शिवसेनेची वाघीण गेली 


वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत निष्ठा आणि आदर असणाऱ्या शिवसेनेची वाघीण नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाल्याची क्लेशदायक बातमी समजली आणि अंतःकरण हेलावून गेले .मी नाशिकचा संपर्क प्रमुख असताना त्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक म्हणून कार्य करत होत्या. दबदबा होता त्यांचा पुढे नगरसेविकाही झाल्या.. शिवसेनेच्या असंख्यआंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. मला एक प्रसंग आठवतो, मला वाटते निवडणुकीचा कालावधी होता, काही गुंड गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे सत्यभामा ताईच्या नजरेस येताच वीज पडावी त्या वेगाने त्यांनी झडप घातली आणि असा काही प्रसाद दिला की ते तेथून प्रसार झाले. धाडस त्यांच्या रोमा रोमात भिनले होते.अलीकडे आदरणीय पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्या उत्तम काम करत होत्या. महापालिकेत त्यांच्या कामाचा ठसा उमटला होता.
आणि अचानक ही दुःखद बातमी आली.
हा कोरोना अजून किती हतबल करणार आहे.आपल्या हातात फक्त नतमस्तक होणे आणि हात जोडून श्रद्धांजली वहाणे एव्हडेच उरले आहे. शिवसेनेची वाघीण गेली याचे मनस्वी दुःख आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांति देवो ही प्रार्थना..!!
सत्यभामा ताईस भावपूर्ण श्रद्धांजली !!
ओम शांतिः शांतिः !!
अरविंद सावंत
खासदार