सर्वात वर

‘शुभमंगल सावधान’

डाॅ स्वाती विनय गानू

‘ शुभमंगल सावधान ‘ म्हटलं की मंगलाष्टके संपून लग्न लागणार, वाजंत्री वाजणार, एकमेकांच्या गळ्यात हार घातले जाणार, दोन व्यक्ती लग्नाच्या पवित्र बंधनात गुंफले जाणार. हे एक गोड स्वप्न असतं जे साकार होत असतं.पण शुभमंगल करताना सावधान राहणं किती महत्वाचं असतं ह्याचा विचार व्हायला हवा. आपल्याकडे बहुतेक वेळा आईवडील लग्नसमारंभात उपवर मुलामुलींसाठी स्थळाच्या शोधात असतात.काही वेळेला ओळखीतून किंवा मध्यस्थाकडून लग्न जुळवली जातात.पण अलिकडच्या काही वर्षात विवाह

जुळवणा-या संस्था, वर-वधू मेळावे यांची मदत घेतली जाते.मात्र सध्याच्या काळात ऑनलाईन संस्था, वेबसाईटस वर लग्नं जुळवली जाताहेत.यांच्याकडे मुलामुलींचा फोटो,शिक्षण,छंद, कौटुंबिक माहिती पाठवली जाते.मग पुढची प्रोसेस सुरु होते. घरातली मोठी माणसं सगळं पाहून, चौकशी करून,पारखून लग्नं ठरवतात तर मग ‘सावधान ‘कशाला हवं असा प्रश्न पडू शकतो.

पण ऑनलाईन लग्न जुळवताना फसवणूक होण्याची शक्यता बरीच असते.वेबसाईटवर टाकलेले फोटो बहुतेक वेळा जुने असतात म्हणजेच त्यात मुलंमुली तरूण दिसतात.शिक्षणाबाबत अपूर्ण, असमाधानकारक किंवा खोटी माहिती दिलेली उदाहरणंही खूप आहेत.संकोचामुळे आर्थिक उत्पन्न विचारलं जात नाही.कधी विचारलं गेलं तर नीट उत्तर दिलं जात नाही. कुटुंबात कोण कोण आहे?काय शिक्षण झालंय? कुठे काम करतात?काय नोकरी किंवा व्यवसाय करतात ही माहिती घ्यायलाच पाहिजे आणि ती तपासूनही पाहिली पाहिजे. तिची सत्यता पडताळून पाहणं हा लग्नातला महत्वाचा भाग आहे.

ऑनलाईन किंवा डेटिंग साईट,मिटिंग साईट,मॅचमेकर साईटसवर लग्न ठरवताना फोनवर बोलणं होतं.तुमचं प्रोफाईल, त्यातला फोटो आणि वय जास्त अट्रॅक्ट करतं.त्यात बोलण्यात समोरचा व्यक्ती जर तरबेज असेल तर आपल्या गोड बोलण्याने तुम्हाला भुरळ घालतो.जितकं अधिक संभाषण तितकी भावनिक गुंतवणूक वाढत जाते.म्हणून खात्री वाटली तरच भेट घ्यावी .प्रथम भेटीत अनोळखी ठिकाणी जाण्यापेक्षा घरी किंवा तुमच्या मित्र मैत्रिणीला बरोबर घेऊन मगच भेटायला जावं .सुरक्षितता, योग्य ती काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे.भावनेच्याभरात वाहून न जाता किंवा तुम्हाला सांगितल्या गेलेल्या माहितीवर डोळे मिटून विश्वास न ठेवता केअरफुली, मॅच्युअर्डली ह्या भेटी,लग्न करण्याची प्रोसेस हाताळायला हवी.आपण ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहोत,त्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगायचं आहे तेव्हा त्याचा निर्णय विचारपूर्वकच व्हायला हवा.कारण एकदा का पाऊल पुढे टाकलं की मग ते मागे घेणं वाटतं तितकं सोपं नसतं.

अशी बरीच उदाहरणं ज्यात फक्त मुलींचीच नाही तर मुलांचीही फसवणूक झालेली पहायला मिळते. आपली मुलगी, आपला मुलगा साधारणपणे कोणत्या कुटुंबाशी संबंध जोडतोय.त्या घरातील माणसं,त्यांचं बोलणं, वागणं, विचार, घर,रीतिरिवाज याबद्दल मनात शंका येत असेल तर थोडा वेळ घ्या. विचार करा,इतरांशी चर्चा करा.मनात धाकधूक, शंका ठेवून निर्णय घेऊ नका. काहीजण म्हणतील सगळं पाहूनही कधीकधी लग्न फसतात. त्रास होतो, छळ होतो..पण तरीही काळजी घ्यायलाच हवी.चौकशी करुनच लग्न करावं.

काही लोक इतरांसमोर गोड बोलतात पण घरात त्यांचं वागणं भयंकर असतं.मुलामुलींच्या बाबतीत लग्नानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो.मुलांच्या बाबतीत त्याला स्वतःच्या आईवडिलांशी बोलू न देणं,त्यांना आर्थिक, वैद्यकीय मदत करू न देणं ,त्यांना घरी रहायला न बोलावणं ,त्याच्या पगाराचा हिशोब मुलीच्या आई वडिलांनी मागणं,त्याच्या प्रत्येक मिनिटामिनिटाची चौकशी करणं असा त्रास दिला जातो. मुलींच्या बाबतीत होणारी फसवणूक शारीरिक, मानसिक, भावनिक असते आणि याची व्याप्ती मोठी असते कारण ब-याच वेळेला त्या साॅफ्ट टारगेट असतात.अशा केसेस कौन्सिलिंगसाठी येतात तेव्हा हे स्पष्टपणे जाणवतं की जेव्हा तुमची फसवणूक होते तेव्हा तुमचं भाबडेपण, इनोसन्स हा तुमचा मूर्खपणा ठरतो.आम्हाला वाटलं,आम्ही विचारलंच नाही, असं कसं बोलायचं?त्यांना काय वाटेल?

अतिचिकित्सा करणं बरी नाही.ओळखीतलंच स्थळ होतं,ऑनलाईन सगळं प्रोफाईल छान होतं.त्याचं आधी लग्न झालं होतं हे माहीतच नव्हतं. ती नव-यापासून वेगळी राहतेय पण मुलगी आहे हे लपवून ठेवलं मॅडम,शिवाय अजून लीगल डिव्होर्स झाला नाहीय आणि डाॅटकाॅमवर प्रोफाईल टाकलं.अशी तक्रारवजा सारवासारव नंतर करून काही उपयोग होत नाही.

ही फसवणूक फक्त तरुण मुलामुलींच्याच बाबतीत होते असं नाही. जे आपल्या मतांनुसार ,विचारांप्रमाणे उशीरा लग्न म्हणजे चाळीस पंचेचाळीशीत लग्नाचा विचार करतात तिथे फार तडजोड करावी लागेल या कल्पनेने फार खोलात जाऊन चौकशी न करता लग्न केलं जातं.लग्न होतंय हेच काय कमी आहे असं म्हणून घाईने लग्न होतात.यात खूपदा फसवणूक घडते.

पंचावन्न – साठीत जेव्हा पार्टनरची साथ मृत्यूमुळे सुटते तेव्हा होणा-या पुनर्विवाहातही फसवणूक झालेले महिला किंवा पुरुष लोक काय म्हणतील? काय गरज होती या वयात लग्न करण्याची? या भीतीने अशी लग्न सहन करताहेत.खरं म्हणजे लग्न हा दोन जीवांशी एकत्र येऊन सुखाने, आनंदाने आयुष्य जगण्याचं एक सुरेख नातं पण दुर्दैवाने यात फफसवणुकीचा धोका आहे म्हणूनच ‘शुभमंगल सावधान ‘ हा मंत्र ध्यानात ठेवा.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती विनय गानू