सर्वात वर

आईकडून खाण्याचे पदार्थ शिकतोय- सिद्धार्थ बोडके

बातमीच्या वर

नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या तीनही माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सिद्धार्थ बोडके याच्याशी या निमित्ताने गप्पा मारल्या. अनेक मालिकांमध्ये दिसणार्‍या चेहर्‍यांमध्ये नाशिकचा हा चेहरा आपलं लक्ष वेधून घेतो. त्याची “तु अशी जवळी रहा” हि मालिका विशेष गाजली. या भूमिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. भय या चित्रपटामध्ये त्याने काम केलंय तसच अनन्या या नाटकामध्येही तो खुप अप्रतिम भुमिका साकारतोय. तो या लॉक डाऊन मध्ये नक्की काय करतोय हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय….

(स्वरदा कुलकर्णी,नाशिक)
मी माझ्या कामानिमित्त मुंबईमध्ये होतो. रोजचं रूटीन, शूट, नविन प्रोजेक्टवर काम अश्या अनेक गोष्टी चालूच आहेत. माझे महत्वाचे काम असल्याने परिस्थितीची कल्पना आल्यावर निघायचा प्रयत्न केला. सगळीकडे लॉक डाऊन जाहीर झाल्यावर मी निघालो खरं पण अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मजल दरमजल करत नाशिकला पोहोचलो. बरं झालं नाशिकला सुखरूप आलो कारण पुढे हि परिस्थीती कशी आणि किती दिवस राहिल याचा अंदाज नव्हता. नशिक-मुंबई-नाशिक या सातत्याने चालणार्‍या प्रवासातून एक ब्रेक मिळाला. मला खुप दिवसांनी अशी मोठी सुट्टी मिळून आणि बाहेरचे कोणतेही काम न ठेवता मी घरी आहे. त्यामुळे माझ्या घरचे जितके खुश आहेत तितकाच आनंद मलाही झालाय.

मी एवढ्यात माझ्या स्वत:वर खूप काम केलं. व्यवस्थित डाएट आणि एक्सरसाईझ करून वजन कमी केलं. आणि स्वत:ला मेन्टेन ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. मुंबईला असल्यावर माझे जेवणाचे सगळे रूटीन मेन्टेन करणे ही एक परिक्षा असते. घरचे जेवण स्पेशली आईच्या हातचे जेवण मी मिस् करतो. माझ्या डाएटसाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी मला उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे घरी आल्यावर मी आईकडून स्वयंपाक शिकायचाच असं ठरवलं. त्यामुळे सध्या रोज नविन पदार्थ शिकतो आहे. खुप काही चमचमीत करण्यापेक्षा साध्या साध्या पदार्थापासून म्हणजे भाकरी, पोळी, भाज्यापासून सुरुवात केली. हे सगळं करताना डाएट मोडला जाणार नाही याची काळजी घेतो. आहारात नैसर्गिक पदार्थांमधून जास्तीत जास्त प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, फायबर कसे जातील याची काळजी घेतोय. 

कामानिमित्त घराबाहेर असणार्‍यांचे घरी आल्यावर प्रचंड लाड होतात. व्यवस्थित खाणे, आराम करणे यासोबतच घरी असल्यामुळे जास्त भूक लागणे असं होऊ शकतं. पण मी मात्र माझ्याबाबतीत हे अस होऊ नये याची काळजी मी घेतोय.घरात असलो तरी माझा रोजचा व्यायाम मी न चुकता करतो.घरात उपलब्ध डंबेल्स, मॅट्स याच्या साहाय्याने मी सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो. मी ठरवलंय, जेवढे दिवस घरात आहे तेवढे दिवस व्यायामाच्या बाबतीत स्वत:ला नवनविन चॅलेंज करून स्वत:ला फ़िट ठेवणार आहे. या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे मी, माझे आई बाबा खुप गप्पा मारतो. लहानपणीचे किस्से ऐकतो, जुन्या आठवणींमध्ये एकत्र रमतो.खुप दिवसांनी  ह्या मिळालेल्या वेळात आम्ही फ़ॅमिली टाईम म्हणुन प्रचंड एन्जॉय करतो आहोत.

आपण अनेकदा म्हणतो वेळ नाही. आता भरपूर वेळ मिळालाय त्यात मी एक खूप मस्त गोष्ट ठरवली.बाहेर पडता येत नाही, मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही असं काहीही वाटून न घेता या वेळेत माझ्या रोज ओळखीच्या लोकांशी आवर्जून बोलायचं ठरवलं. यामुळे माझ्याच जुन्या मित्र-मैत्रिणींना, ओळखीच्या लोकांना नव्याने भेटतो आहे. हे खुप छान आहे. बोलायची खूप इच्छा असते पण कामाच्या निमित्ताने जमतंच असं नाही. बरं जमलं तरी वेळ कमी पडतो. ह्यानिमित्ताने जो वेळ मिळालाय, जी शांतता मिळालीये त्यानिमित्ताने आपण रिकनेक्ट होऊ शकतो.

मला कविता खूप आवडतात. सध्या, मी वेगवेगळ्या कवींच्या आशयाच्या,कविता वाचतो. पाठ करतोय. आपल्याकडची साहित्यसंपदा खूप मोठी आहे. भाषा कोणतीही असो, भावना या किंवा लेखनाचा भावार्थ खूप महत्वाचा ठरतो. कविता हे भावना समजायचं सहज सोपं माध्यम आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळात मी कवितांचा अभ्यास करतो आहे. 

हा जो वेळ मिळालाय हा मिळण्याची प्रत्येकाला गरज होती, अर्थात कोरोना हे निमित्त मात्र नसावं. यानिमित्ताने आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ मिळाला आहे. तो एकत्र एन्जॉय करा. आपल्यातली कला, छंद, एखादी आवड जोपासू शकतो. आपली स्वत:ची काळजी घ्या! आणि अत्यंत महत्वाची विनंती  घरा बाहेर पडू नका.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली