सर्वात वर

आदेश आणि सुचित्रा बांदेकरांच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

स्टार प्रवाहवरच्या ‘नवे लक्ष्य’ मालिकेत सोहम बांदेकर दिसणार पीएसआय जय सुवर्णा दिक्षितच्या भूमिकेत

मुंबई – आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरचं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.स्टार प्रवाह (Star Pravah)वरील ललित २०५ या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता सोहम बांदेकर स्टार प्रवाहच्याच (Star Pravah) ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. 

सोहमला लहानपणा पासूनच अभिनयाची आवड होतीच मात्र निर्मात्याची जबाबदारी पार पाडत असताना अभिनयाची आवड अधिक वाढतच गेली. इतर कलाकारांना सेटवर सीन करताना पाहून मी जरा या भूमिकेत असतो तर हा सीन कसा केला असता याचा सोहम अभ्यास करत गेला . ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या निमित्ताने सोहमचा अभिनय पदार्पणाचा हा सुवर्णयोग जुळून आला आहे. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सोहम पीएसआय जय सुवर्णा दिक्षित ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या या व्यक्तिरेखेसाठी सोहम सध्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.  

नवे लक्ष्य मालिकेतील भूमिकेबद्दल बोलतांना सोहम म्हणाला, ‘पोलिसांचं कार्य शब्दात मांडता येणारं नाही. त्यामुळे या रिअल हिरोजना साकारणं प्रचंड आव्हानात्मक आहे. सीनसाठी वर्दी चढवल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. या वर्दीची प्रचंड ताकद ऊर्जा आहे की भूमिका साकारतांना थकवा अजिबात जाणवत नाही.

मी पीएसआय जय ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. पीएसआय जयला लहानपणापासूनच पोलीसी वर्दीचं पॅशन होती. महिलांचा प्रचंड आदर असलेला जय ,वडिलांनी दिलेले चॅलेंज स्वीकारुन एमपीएससी टॉप करतो .जयचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तो त्याच्या नावात ही आईचं नाव लावतो. 

खऱ्या आयुष्यातही मला माझी आई खुप जवळची आहे. आई वडिलांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे हे आव्हान मी स्वीकारु शकलो. गेल्या वर्षभरा पासून मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग जयची भूमिका साकारण्यासाठी मला होतो आहे.

उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम ‘नवे लक्ष्य’लाही मिळेल याची मला खात्री आहे.  नवे लक्ष्य ७ मार्चपासून दर रविवारी रात्री १० वाजता  स्टार प्रवाहवर (Star Pravah) रसिकांच्या  भेटीसाठी येणार आहे.