सर्वात वर

नाशिकला होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या निमंत्रणाचा स्वीकार 

नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literary Convention) नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन यंदा २०२१ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल तसेच संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा करून निश्चित करण्यात येतील असे ही पाटील यांनी सांगितले. 

साहित्य संमेलनासाठी नाशिक, पुणे,सेलू,अमळनेर अशी निमंत्रणे आली होती. त्याचप्रमाणे पुण्याच्या सरहद संस्थेकडून देखील फेर निमंत्रण पाठवण्यात आले होते. साहित्य महामंडळाने या निमंत्रणावरून स्थळ निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची निवड केली असल्याची घोषणा अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. 

गेल्या वर्षी ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये झाले होतं. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली होती. मात्र, यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले होते.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाला ही आनंददायी बाब – छगन भुजबळ

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literary Convention) नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. याबाबत लोकहितवादी मंडळातील काही सदस्यांनी आपली भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आपण कळविले होते. त्यानंतर आज साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे.अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल यासाठी आपण सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देऊ तसेच नाशिककरांच्या वतीने देशभरातून आलेल्या साहित्यिकांचा योग्य असा मान सन्मान ठेवला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.