सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू

वेळेची बंधने पाळून उद्योग-व्यवसाय सुरु करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक – आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेट मध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्ण संख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल ३ प्रमाणे निर्बंध (Third level Restrictions) ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश यथाशीघ्र पारित करण्यात येतील व सोमवार पासून लागू होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कोरोनाबाबत  जिल्ह्यातील सद्यस्थितीची तसेच शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत (Third level Restrictions) माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी आपल्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना संबंधित करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसात जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी होत आहे. तसेच  म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या देखील काही प्रमाणात कमी होत आहे. या आजाराच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टर्सला करण्यात आलेल्या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून या आजाराच्या तीन यशस्वी शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. म्युकरमायकोसिससाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री यांना सांगितले.
यावेळी नाशिक सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा आढावा पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी घेतला.

तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये अंशत: बदल

तिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये (Third level Restrictions) अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व  आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू राहील. याचप्रमाणे शनिवार व रविवारसाठी सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. याबाबत जिल्हा प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत स्वतंत्ररित्या आदेश जारी करण्यात येणार आहेत. अधिकृत आदेश जारी होईपर्यंत कोणत्याही अफवांवर अथवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना केले आहे.