सर्वात वर

महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान : ललित गांधी

सरकारने तातडीने बिनव्याजी कर्ज व नुकसान भरपाई द्यावी

कोल्हापूरमहाराष्ट्रात कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या प्रलयंकारी महापुरा मध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे सर्वस्व नष्ट झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री  (वेसमॅक्) चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. २०१९ नंतर अवघ्या दोनच वर्षात पुन्हा एकदा महापुरा चा सामना करावा लागला आहे.


या दरम्यान कोरोना  महामारीच्या संकटामुळे व्यापारी कोलमडून पडला आहे. व्यापाऱ्यांची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. त्यात या महापुरामुळे  व्यापाऱ्यांचे सर्वस्व संपुष्टात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक  भागात व्यापारी पुराच्या संकटात सापडला आहे. सांगली मधील नुकसान अवर्णनीय आहे. अशाच पद्धतीने महाड, चिपळूण, बांदा अशा कोकणातील अनेक बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांचे सर्वस्व महापुरात वाहून  गेले आहे.

समाजातील सर्वच घटक महापुराच्या संकटात सापडले आहेत. अशा घटकांना अन्य सुस्थितीतील व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. पुराच्या कालखंडात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याला प्राधान्य  देण्यात येत आहे.

मात्र व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. चेंबर तर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये या सहा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार व्यापाऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले असून आरंभिक नुकसानीचा आकडा सतराशे कोटी रूपये असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली . या बाधित व्यापाऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. अनेक भागात विमा कंपन्यांकडून क्लेम देण्यामध्ये यापूर्वी अडचणी आल्या होत्या. तशा अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी सरकारने विमा कंपन्या व व्यापार यांना कर्ज देणाऱ्या बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे असेही ललित गांधी यांनी सांगितले. 


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती घेऊन समाजाच्या स्तरावर होऊ शकणारी मदत, तसेच सरकारकडून नुकसानभरपाई व मदत मिळण्यासाठी चेंबर तर्फे पाठपुरावा करणार असल्याची माहिती वेसमॅक चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.