सर्वात वर

त्रिभंग

एनसी देशपांडे

पार्श्वभूमी
(Tribhang) मानवी आयुष्य म्हटलं तर गुंतागुंतीचं आणि म्हटलं तर सरळसोटही. हे खरं तर ज्याच्या त्याच्या मानण्यावर अवलंबून असतं. देवाने मानवाचा जन्म दिलाय मग जसं त्याने आखलंय तसं जगण्यात काय हरकत आहे. पण तसं होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग सामोरे येतात की आजवरचा अनुभवही उपयोगी पडत तर नाहीच आणि मग अननुभवी माणसाप्रमाणे ऐनवेळी ती व्यक्ती त्याप्रसंगी काय करेल, कशी वागेल आणि अंतत: काय निर्णय घेईल, याचा अंदाजच बांधता येत नाही. परंतु अशा वर्तनाचा किवा समयोचित निर्णयाचा संबंधित व्यक्तीवर काय परिणाम होतो, याची त्या व्यक्तीला सुतराम कल्पना नसते. समज-गैरसमजाचं हे ओझं बाळगत जगणं, म्हणजे एक सर्कसच असते. ही सर्कस आपण कितीही यशस्वीपणे निभावून नेली तरीही आपसातील संबंधांना आपल्याही नकळतपणे सुरुंग लागलेला असतोच. आपल्या निर्णयामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडामोडी झाल्या आणि त्यामुळे आपसातील संबंधात काय दुरावा निर्माण झाला, याचा अंदाजच बांधता येऊ शकत नाही. एस्पेशियली स्त्रियांच्या बाबतीत जर अशी काही गोची झालीच तर ……  

स्त्रीला आपली ‘ताकद, कर्तुत्व आणि सामर्थ्य’ याची ओळख झाली. तिला ‘पर्सनल आणि प्रोफेशनल’ लाइफचं तंत्र उमगलं आणि एका नव्या उमेदीने या दोन्ही जबाबदाऱ्या ती सहजसुलभपणे सांभाळू लागली. पण आपलं ‘घर आणि संसार’ ही प्राधान्ये ती टाळू शकली नाही, विसरू शकली नाही आणि दुसऱ्यावर सोपवू शकली नाही. अंगी असलेलं कला-कौशल्य, नोकरी-व्यवसायामुळे आलेलं स्वावलंबन आणि आत्मभान यामुळे तिची प्रतिभा  प्रगल्भ होते. शिक्षण, नोकरी, नवीन ओळखी, आत्मविश्वास आणि लेखन हा प्रवास सुलभ होतांनाच नवऱ्याची पुरुषी वृत्ती फणा काढून उभी रहाते कारण आपल्यापुढे जात असलेली बायको ही सल या दोघांमध्ये दरी सोबतच एक तिढा निर्माण करते. मग त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्यास कितपतसा वेळ लागणार? 


मनापासून लेखन हाच त्यांचा श्वास आणि ध्यास असलेल्या नयनतारा(तन्वी आजमी), या एक प्रतिथयश लेखिका. लेखनाच्या नादात आपल्याच मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपाने सासूच्या काय रडारवर असते. परंतु मुलं आणि लेखन या दोन्हींना समसमान जपण्याच्या उद्देशाने नवऱ्यापासून वेगळं होतात. त्यामुळे अर्थातच मुलांना वडिलांच्या प्रेमाला आणि छायेला मुकावं लागतं. आपल्या मुलांवर तितकच प्रेम असूनही वडील मात्र त्यांच्याकडे कधीही फिरकत सुद्धा नाही. याच गोष्टीचा प्रचंड राग अनुराधा(काजोल) आणि रबिंद्रो(वैभव तत्ववादी) यांच्या मनात घर करून राहिलेला असतो.त्यातच नयनच्या आयुष्यात आलेल्या रैना(कंवलजीत) मुळे अनुराधाचं जगणं असह्य झालेलं असतं. तरीही अनुराधा या गोष्टीचा उल्लेखही नयन जवळ कधीही करत नाही.

परिणामस्वरूप ती चिडचिडी बनलेली असते. अनुराधा आणि रबिंद्रो यांच्यात मात्र निस्सीम प्रेम असतं. या सर्व गोष्टींची जाणीव नयनला होते, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यातच हातातील शक्ती गेल्याने तिचं लिहिणंही बंद झालेलंय. परंतु तिच्या लेखनाचा चाहता आणि तिचा निस्सीम भक्त असलेल्या एका लेखकाच्या मदतीने तिने आत्मवृत्त लिहायला घेतलेलं असतं. तो प्रत्यक्ष व्हिडीओ शूट करून तिचं बोलणं रेकोर्ड करत असतो. अशातच तिला हृद्यविकाराचा धक्का बसतो आणि दवाखान्यात दाखल होताच ती कोमात जाते, तो पर्यंत या तिघांमधला तिढा सुटलेला नसतो.

त्रिभंग(Tribhang) ही तीन पिढ्यांतील महिलांची कहाणी आहे. कथानकाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध लेखिका नयनतारा (तन्वी आझमी) हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि कोमामध्ये जातात. त्यांची कन्या अनुराधा (काजोल), ही बॉलीवूडमधली यशस्वी अभिनेत्री. आपल्या आईबद्दल तिच्या मनात प्रचंड राग असल्याने त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात अबोला आहे. परंतु शेवटी आपली आई या नात्याने ती दवाखान्यात तिला बघायला दाखल होते. परंतु आई कोमात असल्यामुळे त्यांच्यात शेवटपर्यंत संवाद होऊ शकत नाही. अनुराधाची लाडकी कन्या माशा (मिथिला पालकर) विवाहित असून वास्तववादी आहे. नयनथारा कोमात असतांना, त्यांच्या आत्मवृत्ताचे लेखन करणारा मिलन(कुणाल रॉय कपूर) हळूहळू त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत जातो आणि भूतकाळातील घटनांचा आणि गैरसमजाचा उलगडा होत जातो. त्यामुळे या तीन स्त्रियांच्या नात्यात कसे सकारात्मक बदल घडत जातात, हीच या चित्रपटाची संहिता.


हे सगळं दिग्दर्शिका रेणुका शहाणे, यांनी ‘त्रिभंग’ (Tribhang) या चित्रपटाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सादर केलंय. स्त्रीच्या आयुष्यातील एक निर्णय आणि तीन पिढ्यांवर त्या निर्णयाचा होत जाणारा परिणाम याचं यथार्थ दर्शन या भूमिकांच्या माध्यमातून सशक्तपणे दाखवण्यासाठी कलाकारांची केलेली निवड सार्थ ठरलीय. (Tribhang) या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अजय देवगण, पराग देसाई, दीपक धर, नेगी, सिद्धार्थ पी मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा यांनी संयुक्तपणे सांभाळलीय. हा विषयच जरा नाजूक असल्याने, रेणुका शहाणे यांनी तो हाताळलाही त्याच पद्धतीने. मानवी दृष्टिकोनातून अगदी नाजूक असाच हा विषय आहे. कारण त्यात तीन पिढ्यांतील, एकाच कुटुंबातील तीन महिलांची मानसिकता आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन उत्तमपणे बघायला मिळतो. नयनतारा, अनुराधा आणि माशा यांच्यातील वाद, विवाद, सुसंवाद आणि नातं म्हणजे स्त्री जीवनाचा वस्तुपाठच, जो दिग्दर्शिकेने सक्षमपणे दाखवलाय. परंतु बोधामृत किंवा उपदेशात्मक अशी चर्चा इथे अजिबात नाही.

स्त्री जीवनातील वास्तव दाखवतांना काही प्रसंग गडद निश्चितपणे वाटतात. पण सामान्य स्त्रीच्या आयुष्यातही असे प्रसंग घडतच असतात. अशा वेळी नक्की काय करावं, असा प्रश्न ज्या स्त्रियांना पडत असेल त्यांना त्यांची उत्तरे इथे निश्चितपणे गवसतील. तो कथानकाचा किंवा दिग्दर्शकाचा मूळ हेतू नसेलही परंतु एक मोठी शिकवण समस्त स्त्री जातीला या चित्रपटातून मिळते. ‘आई-मुलगी आणि तिची मुलगी’ अशी तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या पात्रांमध्ये जन्म, स्व-कर्तुत्व, स्वतंत्र विचार आणि यशस्विता याखेरीच कोणताही समान धागा नाही. 


अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नयनतारा या पात्राला कथानकाची आणि संवादाची उत्तम साथ लाभली आणि तन्वी आजमी यांनी दिग्दर्शकाला अपेक्षित भूमिका उत्तमपणे साकार केलीय. काजोल या अभिनेत्रीचा ऑराच खूप मोठा आहे. या भूमिकेत तिने बॉलीवूडची स्टार आभिनेत्री, बालपणापासूनचा आईवरचा राग आणि विवाहित मुलीची आई या तिनही प्रकारामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उठवलाय. माशा या भूमिकेत मिथिला पालकरला फारसा वाव नाही. परंतु आईच्या छायेखाली वाढूनही, स्वतंत्र मताची आणि शांत स्वभावाची ही भूमिका छान उभी केलीय. रबिंद्रो हे अध्यात्माकडे झुकलेलं आणि बहिणीवर नितांत (unconditional) प्रेम असलेलं पात्र सुंदर साकारलय. मिलनच्या रोलमध्ये कुणाल रॉय कपूर याने मस्त कामगिरी केलीय. एका सुंदर catalist agent ची ही भूमिका ‘बंदिश बँडीस्ट’ मधल्या ‘अर्घ्या’च्या भूमिकेच्या एकदम विरोधी असूनही त्याने उत्तम रंग भरलेत. बाकी मानव गोहिल, कंवलजीत यांना फारसा वाव नाही, परंतु त्यांचा वावर सुखद झालाय. या सगळ्यांमध्ये अगदी लहानशी भूमिका असूनही तरुण नयनताराच्या भूमिकेत आवर्जून लक्षात रहाते ती श्वेता मेहेंदळे.


प्रत्येक आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीत सकारात्मकच विचार करत असतात. त्यांच्या भविष्याच्या चिंतेने त्यांना चांगलं घडवण्यासाठी धडपडत असतात. त्याचसोबत स्वत:च्या अस्तित्वाची लढाईसुद्धा असतेच. या दोन्ही बाजूंचा समन्वय साधतांना थोडेबहुत निर्णय चुकूही शकतात, याची शक्यता नाकारताच येणार नाही. या निर्णयाचा एकमेकांच्या आयुष्यावर होणारच. परंतु अशा परिस्थितीत गैरसमजांच्या गर्तेत अडकण्यापेक्षा सुसंवाद साधून त्यावर वेळच उपाय करणेच योग्य, असा काहीसा आणि अत्यंत महत्वाचा संदेश रेणुका शहाणे या दिग्दर्शिकेने या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. हा चित्रपट वाचकांनी आवर्जून बघावा आणि योग्य तो निष्कर्ष काढावा, हेच बरं! (Tribhang)