सर्वात वर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नाशिक – राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला होता. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(University of Health Sciences) सोमवार १८ एप्रिल पासून होणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.या सर्व परीक्षा माहे जून 2021 मध्ये घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक सविस्तरमाहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ ww www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.

याबाबत विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.श्री.अमित देशमुख यांनी सांगितले की, राज्यात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच या आजाराविषयी आवश्यक खबरदारी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य शिक्षणातील विविध विद्याशाखांच्या लेखी परीक्षा संदर्भात राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली. या अनुषंगाने शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांनुसार व परिस्थितीनुरुप लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सदर परीक्षा माहे जून २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत.

याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की,विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी- २०२० व उन्हाळी २०२१ सत्रातील लेखी परीक्षा सध्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. कोविड-19 आजाराची परिस्थिती लक्षात घेता सदर परीक्षा ठराविक कालावधी करीता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भात सोशल मिडीयाव्दारे सातत्याने बनावट संदेश व माहिती पसरविण्यात येत आहेत. सदर चूकीच्या संदेशापासून विद्यार्थी व पालकांनी सावध रहावे असे त्यांनी सांगितले.

सुधारित वेळापत्रकानुसार आरोग्य विद्यापीठाच्या (University of Health Sciences) सर्व विद्याशाखेच्या उन्हाळी सत्रातील फेज तीन मधील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेस दि. ०२ जून २०२१ ते दि. २१ जून २०२१ कालावधीत घेण्यात येणार आहेत.

प्रथम वर्ष वैद्यकीय विद्याशाखेच्या नवीन सप्लींमेटरी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ०२ ते १२ जून २०२१ आणि विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रमाची परीक्षा दि. ०३ ते ०५ जून कालावधीत होणार आहे. तसेच मॉडर्न मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हाईडर कोर्सची लेखी परीक्षा दि. ०२ ते ०४ जून २०२१ कालावधीत घेण्यातयेणार आहे.

परीक्षेचे सुधारित विस्तृत वेळापत्रक विद्यापीठाचे (University of Health Sciences) अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार संलग्नित महाविद्यालय प्रमुख, परीक्षा केंद्र प्रमुख, विद्यार्थी व संबंधितांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. तसेच संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी परीक्षा संदर्भातील सुधारित वेळापत्रक महाविद्यायातील सूचना फलकावर प्रसिध्द करणेबाबत कार्यवाही करावी असे विद्यापीठाकडून (University of Health Sciences) कळविण्यात येत आहे.