सर्वात वर

आता ऑनलाईन रजिस्टर न करता १८ ते ४४ वयोगटालाही मिळणार लस : केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं एक मोठी घोषणा केली असून आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस (Vaccines) घेता येणार आहे.त्यानंतर लसीकरण केंद्रावरच या नागरीकांची  कोविन ॲपवर cowin.gov.in नोंदणी होणार आहे.आतापर्यंत केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नोंदणी शिवाय लस (Vaccines) दिली जात होती,पण आता या निर्णयामुळे १८ ते ४४ वर्षातील नागरीकांना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करता येणार आहे .अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

लस घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरीकांना अनेक दिवसापासून प्रयत्न करून पण स्लॉट मिळत नाही अशा तक्रारी आहेत तसेच काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस (Vaccines) वाया जाण्याचीही शक्यता असते. त्याच प्रमाणे  ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी होण्यात बऱ्याच अडचणी येतात.एकाच मोबाईल नंबरवरून ४ जणांना नोंदणी करण्याची  सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 मात्र, ही सुविधा केवळ सरकारी रुग्णालयातील  लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील.यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात आले असल्याचे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय लागू करायचा अथवा नाही हे संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून असणार आहे