सर्वात वर

पालेभाज्या व आयुर्वेद

वैद्य.राहुल रमेश चौधरी(एम्.डी.(आयु.),मुंबई)

Vegetables and Ayurveda

आजच्या स्मार्ट शहरात राहण्याची मनीषा बाळगणाऱ्या माणसाने स्वत:चे आरोग्य देखिल तेवढेच स्मार्ट ठेवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मनुष्य नेहमीच व्यायाम, जीम, चांगले खाद्य, फळे, भाजीपाला, सुकामेवा, शुध्दपाणी या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आज समाजात हे सर्व प्रयत्न करत असतांना शास्त्राच्या मूळ विचारांबद्दल अज्ञान, लोकांचे व्यवहारातील गैरसमज व त्यांचे स्वैराचरण नजरेस येते. जग संशोधनाच्या दिशेने अग्रेसर असताना आपण का म्हणून मागे राहायचे म्हणून लोक जास्तीत जास्त पाश्चात्य देशांचे अनुकरण करण्यास मागे पुढे पाहत नाही, असे अंधानुकरण करताना स्वत:चे आरोग्य कधी खालावते हे कळतसुध्दा नाही आणि आजारांचा ससेमिरा मागे लागतो तो काही केल्या सुटत नाही. याकरिता आयुर्वेद शास्त्रात(Vegetables and Ayurveda) जे वर्णन आहे त्याचे पालन या काळात अगदीच तंतोतंत शक्य नाही पण जास्तीत जास्त करणे शक्य आहे आणि ते केलेच पाहिजे.

आज आपण अश्याच एका गैरसमजाबाबत नजर टाकूयात, सध्या सगळीकडॆ आवर्जून सांगितले जाते पालेभाज्या भरपूर खाव्यात आणि अगदी त्यातून काय काय भरपूर घटक मिळतात येथपर्यंत…पालेभाज्या भरपूर खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होते इत्यादी. पाश्चात्य लोकांच्या सांगण्यात पालेभाज्यांचा जास्त वापर करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हे समजून घेतले पाहिजे की पाश्चात्य देशात आहारात भरपूर भाग हा प्राणीजन्य द्रव्यांचा असतो.त्यामध्ये मांस, मासे, अंडी, दूध, दही, चीज या सर्व मल निर्मिती कमी करणाऱ्या  किंवा तंतुमय ज्याला आपण fibers  म्ह्णतो असे घटक कमी असणाऱ्या द्रव्यांचा समावेश असतो व याचकरिता त्याची पूर्तता व्हावी म्हणून आहारात पालेभाज्या किंवा कच्च्या भाज्या खाण्याची प्रथा रुढ झाली, परंतु भारत देशातील वातावरण असा आहार घेण्यास मानवणारे नाही हा प्रत्येक वेळी वैद्यकीय व्यवसायात येणारा अनुभव आहे. आज आयुर्वेद प्रॅक्टिस करतांना ;केस गळणे, शरीरातील हाडे ठिसूळ होणे-दुखणे ,केस पांढरे होणे,दृष्टी तरुण वयातच मंद होणे,चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे,रक्त खराब झाल्याची लक्षणे दिसणे अश्या तक्रारी घेवून येणारे रुग्ण येतात आणि यामध्ये बऱ्याच वेळा दररोज सकाळ सायंकाळ पालेभाज्या खाणारे रुग्ण असतात.भरपूर रुग्णांना पालेभाज्यांच्या रोजच्या वापराने पोटदुखी, शौचाला अधिक प्रमाणात होणे, पोटात गुबारा धरणे इत्यादी प्रकारचे त्रास होतात.वास्तवीक पाह्ता आधुनिक मतानुसार असे अजिबात घडायला नको पण असे वेळोवेळी दिसून येते.

आयुर्वेद शास्त्रानुसार पालेभाजी (Vegetables and Ayurveda) (उदा.पालक,मेथी आदी), फुले (केळफुल), फळे (भोपळा,गिलके आदी), देठभाजी (कमळदेठ आदी), कंदमुळे (सूरण आदी), छत्रशाक (मश्रुम) हे असे भाज्यांचे सहा प्रकार आहेत, आणि हे सहाही प्रकार उत्तरोत्तर पचनास जड असतात. पालेभाज्या कच्च्या खाणे तर अतिशय चूक आहे..कच्चे खाण्यासाठी आयुर्वेदाने हरित वर्ग सांगून ठेवला आहे त्यात आले,कोथिंबीर,मूळा,गाजर,लसुन,कांदा इत्यादी चा समावेश होतो. नियमीत पालेभाज्या का खावू नये याच उत्तर असे कि, पाने हा वनस्पती शरीरातील अतिशय कमी आयुष्य असलेला भाग आहे व त्यांचे ठिकाणी पुनरुत्पादनाची शक्ती देखिल कमी असते ,पान लवकर सडतात आणि लवकर कुजतात.शरीरात जे काही पोषण करणारे घटक असतात त्यांना शक्ती देण्यासाठी अश्या पदार्थांचा काही उपयोग राहत नाही….असे पाहण्यात आहे कि शाक कमी प्रमाणात खाणारे किंवा अत्यल्प खाणारे निरोगी दिसून येतात,शरीरास उपयुक्त नसणारी व अति प्रमाणात घेतल्यास शरीराची हानी करणारी गोष्ट का म्हणून खावी?? आजारी व्यक्तिने आपल्याला हितकारक अशीच पानांची भाजी खावी..निरोगी माणसाने खावूच नये.आधुनिक वैद्यक शास्त्र यावर आक्षेप घेईल..त्यांच्यामते विटामीन ‘A’ या हरित द्रव्यापासून मिळते ..पण तसे अजिबात दिसून येत नाहि आणि ते फक्त पालेभाज्यांपासूनच मिळते असेही नाही. याशिवाय तंतुमयता या विषयावर या लेखात आधीच लिहिले गेले आहे.

आज काल भाज्यांचे लवकर आणि भरपूर उत्पन्न घेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर रसायने फवारली जातात यामुळे आजारांमध्ये भरिस भर पडते ती वेगळीच…मुंबई सारख्या शहरात रेल्वे लाईन च्या आजूबाजूला गटारीचे पाणी,रासायनीक पाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याकारणाने रुग्णांमध्ये lead,nickel  सारख्या मेटल पॉइझनींग चे प्रमाण बऱ्याच अंशी दिसून येते. आज भारत मेट्रो सिटि च्या दिशेने अग्रेसर असताना आपल्याला निकृष्ट प्रतीचे खाद्य मिळते हे दुर्दैव आहे..पण त्यात आपण मार्ग काढलाच पाहिजे.

मग शेवटी प्रश्न रुग्णांना असा पडतो कि मग आम्ही खायचे तरी काय…किंबहुना असा प्रश्न सर्वच आयुर्वेदिक वैद्यांना विचारणारे रुग्ण आहेत..बद्लत्या काळानुसार नेह्मी वापरात दुधी,पडवळ,दोडका यासारख्या भाज्या ठेवाव्यात,सूप्यशाक (मूग,मसूर आदी) भाज्यांचा वापर योग्य प्रमाणात ठेवावा.  पालेभाज्यांमधील कडू,तुरट चवीच्या भाज्या,सुकवलेल्या भाज्या कमीत कमी वापराव्या किंवा अजिबात वापरु नये. भाज्या ताज्या आणाव्यात व खाव्यात,एकदम फ्रिज मधे साठा करून ठेवू नये. ज्या भाज्या वापरणार आहेत त्यादेखिल व्यवस्थित नळाखाली चालू पाण्यात धुवुन घ्याव्या..कापून धुवू नये.व शिजवतांना हिंग,लसून,मोहरी,जिरे,तूप,तैल सारख्या गोष्टींचा अवश्य वापर करावा.याव्यतिरिक्त काहीही शंका असल्यास वैद्यांकडून आहारविषयक शंकांचे निरसन अवश्य करून घ्यावे..जेणेकरून आरोग्य व्यवस्थित ठेवता येईल.

मोबा.९०९६११५९३०