सर्वात वर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार(Dilip Kumar) यांचे निधन झालं. आज सकाळी साडेसात वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ९८ वर्षाचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारीच होते.

दिलीप कुमार(Dilip Kumar) यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु त्यांच्या फुप्फुसात पाणी भरल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसुफ खान होते आणि त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी अविभाजित भारतातील पेशावर येथे झाला होता. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदललं होतं. यानंतर संपूर्ण जग त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं.

दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण नाशिकमध्ये झाले. नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सिनेमे फारसे चालले नाहीत त्यानंतर अभिनेत्री नूरजहांसोबत त्यांची जोडी हिट ठरली. ‘जुगनू’ हा दिलीप कुमार यांचा पहिला हिट सिनेमा होता. यानंतर दिलीप कुमार यांनी एकामागोमाग एक अनेक हिट सिनेमे दिले. त्यांचा मुगल-ए-आजम हा सिनेमा त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. ऑगस्ट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्याकाळी बनलेला सर्वात महागडा सिनेमा होता.