सर्वात वर

ज्येष्ठ विचारवंत,पत्रकार ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचे निधन

नागपूर : ज्येष्ठ विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं आज शनिवार १९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा निधन झालं.वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ साला पासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली होती ,त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.

मा गो वैद्य हे  नुकतेच कोरोनातून बरे झाल होते, मागील दोन दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटल मध्ये भरती केले होते नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर वर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी दुपारी अखेरचा श्वास घेतला.काहीवर्षांपूर्वी पहिल्यांदाच संघाने आपली बाजू मांडण्यासाठी त्यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली होती. अतिशय शांत आणि ठामपणे ते आपली बाजू मांडत असत. त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले होते. त्यांचे विविध ग्रंथ आजही प्रचंड गाजलेले म्हणून विख्यात आहेत.  विविध सन्माननीय पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले होते. माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता, विद्यापीठाने त्यांना मानद डी.  लिट. देऊनही गौरवले होते. 

त्यांच्या पश्चात  पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) असा  परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

शोकसंदेश 

नितीन गडकरी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे आज दुपारी निधन झाले. यानिमित्त राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना विनम्र श्रध्दांजली अर्पण केली.

पूज्य श्री गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे व त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझा लहानपणापासून बाबुरावजींशी व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबुराव शतायुषी होतील, हा ठाम विश्वास मला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, याची अतीव दु:ख आहे, अशी भावना व्यक्त करीत ना. नितीन गडकरी यांनी ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशी सद्भावनही व्यक्त केली.  

देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक-विचारवंत श्री मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील, ही खात्री होती. पण, काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

चंद्रकांतदादा पाटील 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक मा.गो.वैद्य यांच्या निधनामुळे देशेसेवेसाठी संघर्ष करणारे झंझावाती वादळ शांत झाल्याची शोकभावना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत(दादा) पाटील यांनी यांनी व्यक्त केली.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,शिक्षक,पत्रकार,विधान परिषद सदस्य असा दांडगा अनुभव मा.गो.वैद्य यांच्या पाठीशी होता. राजकीय जबाबदारी असो वा संघाचे काम , मा गो वैद्य यांनी प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली. देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावणे ही संघाची शिकवण त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे अंगिकारली होती. अशा या महान विचारवंतांच्या जाण्याने समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांची उणीव नेहमी भासत राहील अशी खंत देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रशेखर बावनकुळे 

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे निधनामुळे आपण एका मार्गदर्शकाला मुकलो, अशी भावना माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

बाबुरावांची प्रकृती काही दिवसांपासून चांगली नव्हती. पण ते लगेच अखेरचा निरोप घेतील असे वाटत नव्हते. माझे व त्यांचे वैयक्तिक संबंध होते. अनेकदा त्यांचे मार्गदर्शन मला मिळत होते. एका व्रस्तस्थ, शिस्तप्रिय व संस्कारप्रिय जीवनाचा अंत झाला, याचे मला अतीव दु:ख असून यानिमित्त मी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो, अशा भावनाही बावनकुळे यांनी व्यक्त केल्या