सर्वात वर

‘नातं पुन्हा उजळून येण्यासाठी”नात्यांचे सर्व्हिसिंग” म्हणजे आश्‍वासक हुंकार’- प्रा. डॉ. वृंदा भार्गवे

विश्वास ठाकूर यांच्या “नात्यांचे सर्व्हिसिंग” कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न प्रकाशनपूर्व पहिली आवृत्ती संपली

नाशिक (प्रतिनिधी) – नात्यांचे सर्व्हिसिंग कथासंग्रहात माणसातले माणूसपण जपणार्‍या मानवी वृत्ती, प्रवृत्ती आणि त्याच्या जोडीला असलेले अर्थकारण याची सांगड घालून जगण्यात माणसांची गुंतवणूक म्हणजे काय याचा शोध आहे. त्याबरोबरच जीवनानुभवाकडे पाहण्याची सकारात्मकता आहे. हे पुस्तक म्हणजे नात्यांची कोळीष्टके साफ करण्याचा ऐवज आहे. पुस्तक वाचतांना नातं पुन्हा उजळून येण्यासाठीचा आश्वासक हुंकार आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले.

शब्दमल्हार प्रकाशन, नाशिकने प्रकाशित केलेल्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर घरगुती समारंभात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून संपन्न झाला.

प्रा.डॉ. वृंदा भार्गवे पुढे म्हणाल्या की, या पुस्तकातील कथा म्हणजे निरलसपणे केलेले लेखन आहे. बँकींग क्षेत्रातील अनुभवविश्व असलेल्या या कथा असल्या तरी इथे भाषेला वस्तुनिष्ठता, कलात्मकता आहे. प्रस्थापित जीवन व्यवहारातील ढोंगीपणावर आघातही आहे व जगण्याचं सार सांगणारं ‘कन्फेशन बॉक्सच’ आहे.

प्रा. अनंत येवलेकर म्हणाले की, या कथांनी मला वाचक म्हणून खिळवून ठेवले. कुठल्याही साहित्याचे काम हे नात्या-नात्यांमधील सर्व्हिसिंग करणे होय. त्याचीच प्रचिती या पुस्तकातून येते. यातील सारी पात्रे ही जितीजागती आहेत आणि आपल्या मनाला भिडणारी आहेत. विश्वास ठाकूर हे माणूसवेल्हाळ असल्याने यातील पात्रात जिव्हाळा, मायेचा ओलावा, स्निग्धता आहे. मनुष्य स्वभावातील दोष बाजूला सारून सुंदर जगण्याचा मंत्र देणारं हे लेखन आहे. माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारित जगाचा मार्ग हे पुस्तक दाखवते हे या पुस्तकाचे यश आहे. ग्रे एरिया शोधून त्यात माणुसकीचे रंग टाकण्याचे काम या कथा करतात.आजूबाजूचे नेमके वास्तव पकडून त्यावर नेमकं बोट ठेवून वाचकाच्या मनात अनेक प्रश्‍नही निर्माण करतं.

हेमंत टकले म्हणाले की, यातील कथा ह्या माणुसपणाच्या माणसांचा सन्मान करणार्‍या जाणीवांचा कोलाज आहे. विश्वास ठाकूर हे व्यक्तिमत्त्व असे आहे की, जिथे जाईल तिथे यश मिळेल. जसा त्यांचा स्वभाव आतून जिव्हाळा आपलेपणा असलेला आहे. परकेपण दूर नेणारा आहे. या कथांची जातकुळी अस्सल माणुसकीची आहे. माणसांच्या स्वभावाचे अजब रंग इथे आपल्याला वाचायला मिळतात. या पुस्तकातील दु:ख विस्तीर्ण जगातलं आहे. नाटककार वसंत कानेटकर यांच्या जे रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील बाप-मुलाचं दु:ख ही काही कथांत येते. दुनियादारीतील विलक्षण अनुभवांचे हे संचित आहे. त्यातून मानवी व्यवहाराचे अनेक पैलू समोर येतात. माणसाची ओढ असलेलं हे अक्षरधन आहे. त्याला सर्वांनी जपावं.

शब्द मल्हार प्रकाशनाचे प्रकाशक स्वानंद बेदरकर म्हणाले की, जगणं समजून घेणारं हे लेखन असून दुर्दम्य आत्मविश्वास व मनाच्या खोल-खोल जाऊन जीवनानुभवाचं अस्सलपण या कथांचं ठळक वैशिष्ठ आहे. झाड बहरत असतं त्याचप्रमाणे या कथांच्या निर्मिती प्रक्रियेतील माझा सहभाग, त्याचा प्रकाशक ही विलक्षण गोष्ट या पुस्तकाने मला दिली आणि सजग वाचकाचा अनुभव मी घेतला. सहज आणि स्वाभाविक लेखनशैली आणि पुस्तकातील आपलेपणाला जोडणारा धागा ही या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे रोजच्या अनुभव विश्वापेक्षा पठडी बाहेरचे लेखन आहे. त्याचे वाचक उत्तम स्वागत करीत आहेत. गुरुवार, 01 जुलै 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात या कथासंग्रहाचे नोंदणी सुरु करण्यात आली होती त्याला उत्तम प्रतिसाद मिळून 2 हजार 110 प्रतींची आगाऊ नोंदणी झाल्यामुळे पहिली 1 हजार प्रतींची आवृत्ती संपल्याचे प्रकाशन सोहळ्यात जाहीर करण्यात आले. दुसरी 3 हजार प्रतींची आवृत्ती  मंगळवार 27 जुलै 2021 रोजी प्रकाशित होणार असल्याची माहिती दिली.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. कैलास कमोद यांनी केले. ते म्हणाले की, विश्वास ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील केलेल्या यशस्वी कर्तुत्वापोटी आपण इथे जमलो आहोत. विद्यार्थी दशेपासून युवकविश्व मासिकाचा संपादक म्हणून त्यांची वाटचाल मी बघतो आहे. त्यात मला कायमच वेगळेपण आणि दर्जेदारपण होते. ‘परफेक्शन’ या स्वभावात कायमच आग्रह असतो. त्यामुळे हाती घेतलेले काम कायमच वेगळे ठरते. हा कथासंग्रह म्हणजे विश्वास यांच्या मनापासूनची स्पंदने आहेत. माणूसपणाचं प्रतिबिंब त्यात आहे. गोष्ट सांगण्याची शैली, जिवंत अनुभव, त्यामुळे या कथा आपल्याला भावतात. आशय, मजकूर, मुखपृष्ठ या सर्वांनी मिळून सुंदर निर्मिती आहे. यापुढेही जीवनात आलेले अनुभव त्यांनी पुस्तकरूपाने आणावेत.

पुस्तकाचे लेखक श्री. विश्वास ठाकूर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आई-वडीलांच्या संस्कारातून जीवनावर आतून प्रेम करण्याची मला शिदोरी मला मिळत गेली. लेखक, शिवाजी सावंत कवी कुसुमाग्रज, व. पु. काळे, पु.ल. देशपांडे अशा थोर साहित्यिकांचा सहवास जीवनात मिळाला. भरपूर वाचन त्यातून अक्षरांची ओढ लागली. गेल्या पंचवीस वर्षांतील घटना, भेटलेली माणसे यांना जाणून घेऊन, समजून घेऊन व्यक्त झालो. त्याचं रूप म्हणजे ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हे पुस्तक आहे. उत्तमातल्या उत्तमाचा शोध आणि चांगुलपणाची आस हे या कथा लेखनामागची प्रेरणा आहे. बँकींग सहकार क्षेत्रातील भेटलेल्या व्यक्तींचा हा गोतावळा आहे. तो तुमच्याशीही नातं सांगेल.

प्रा.डॉ. वृंदा भार्गवे यांचा सन्मान सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांनी, प्रा.अनंत येवलेकर यांचा सन्मान बीएसएनएलचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन महाजन, हेमंत टकले यांचा सन्मान हेमंत बेळे, स्वानंद बेदरकर यांचा सन्मान रेडिओ विश्वासचे डॉ.हरीभाऊ कुलकर्णी, डॉ. कैलास कमोद यांचा सन्मान डॉ.स्मिता मालपुरे-वाकेकर, डॉ.मनोज शिंपी यांचा सन्मान विलास हावरे, विनायक रानडे यांचा सन्मान विजय कान्हेकर व प्रसाद पाटील यांचा सन्मान नीलेश राऊत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. पसायदान सौ.राजश्री शिंपी यांनी केले.