सर्वात वर

विश्वास ठाकूर यांच्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रहाचे गुरूवारी प्रकाशन

नाशिक : समाज व्यवहारात भेटलेली माणसे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनुभव यांची सुंदर गुंफण असलेल्या विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग ‘ या शब्दमल्हार प्रकाशन, नाशिकने प्रकाशित केलेल्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या गुरूवार, दि.१५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता घरगुती समारंभात केवळ ठराविक निमंत्रितांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आयोजित करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ. वृंदा भार्गवे यांच्या शुभहस्ते होणार्‍या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हेमंत टकले, डॉ. कैलास कमोद, प्रा. अनंत येवलेकर, प्रकाशक स्वानंद बेदरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार आहेत.

विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना, प्रसंग यांची सांगड घालत माणूसपणाच्या खर्‍या, खुर्‍या कथांचा हा ऐवज आहे. नाती आणि प्रेम हे सूत्र असलेल्या या कथा मराठी साहित्यातला अनोखा प्रयोग आहे. सहकार क्षेत्रात काम करत असतांना भेटलेल्या माणसांचा हा एक कोलाजच आहे.

पैसा हे सर्वस्व नाही, पण पैसा नगण्यही नाही. असे असतांना वर्तन कसे ठेवावे आणि माणसं कशी बांधून ठेवावी हे कथांचे आशयसूत्र आहे.

ख्यातनाम लेखक मधु मंगेश कर्णिक व वसंत आबाजी डहाके यांची ह्या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाची मांडणी व सजावट केली आहे.

तरी वाचक, वितरक, मित्रमंडळी यांनी या पुस्तकाच्या व एकूणच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. तसेच या समारंभासाठी मित्र व हितचिंतकांनी व्हॉट्सअ‍ॅप व फोनद्वारे शुभेच्छा पाठवाव्यात असे आवाहन लेखक विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) व विश्वास ग्रुपने केले आहे.  
*