सर्वात वर

सुप्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण यांचे निधन

मुंबई : सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण(Ram-Laxman) या जोडीतील लक्ष्मण म्हणजे विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले.ते ७९ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसापासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते.रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नागपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण(Ram-Laxman) निधनामुळं भारतीय संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

राम लक्ष्मण (Ram-Laxman) म्हणून इंडस्ट्रीत आपली छाप उमटविलेल्या लक्ष्मण यांचे खरं नाव विजय पाटील असं होतं.आपला खास मित्र राम कदम यांच्या मदतीनं संगीत क्षेत्रात कार्य करत होते. १९७६ पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी ‘राम-लक्ष्मण’ ह्या नावानं संगीत द्यायचे. मात्र १९७७ मध्ये राम कदम यांचं निधन झालं. परंतु आपल्या मित्राच्या आठवणीत ‘राम-लक्ष्मण’ या नावानच संगीत देण्याचे काम सुरू ठेवलं.   

राम लक्ष्मण (Ram-Laxman) यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली होती. यात मराठी मध्ये प्रामुख्याने ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपट आणि त्यातील गाण्याचा समावेश आहे. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांना संगीत दिले आहे. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.