सर्वात वर

विवाहबाह्य संबंधांना जवाबदार कोण कोण ….?

सौ,मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

आपल्या मागील लेखांमध्ये आपण विवाहबाह्य संबंध(Extramarital Affairs), त्याची कारणे इत्यादी विषयावर चर्चा केली. आज आपण मुलीचा विवाह करून दिल्या नंतर पालकांनी किंवा तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे, आवर्जून कोणती पथ्य पळाली पाहिजेत यावर विचार करणार आहोत. तसे केल्यास विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affairs)आळा बसण्यास कश्याप्रकारे मदत होऊ शकते यावर देखील विचार मंथन करणार आहोत. 

प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला अनुरूप असे, स्थळ बघून विवाह लावून देतात, त्यानंतर देखील तिच्या वैवाहिक आयुष्यात तिला मार्गदर्शन करणे, सहकार्य करणे, वेळोवेळी विविध स्वरूपात मदत करणे यासाठी मुलीचे आईवडील सातत्याने प्रयत्न करीत राहतात. आपली मुलगी लग्नानंतर सासरी व्यवस्थित राहावी यासाठी प्रत्येक आई बाप तिला तसें संस्कार, शिस्त, शिक्षण, सवयी लहानपणापासून देतात. लग्न लावतांना देखील स्वतःची सर्व कुवत, शक्ती पणाला लावून मुलीची पाठवणी केली जाते. अनेक ठिकाणी पती – पत्नी, सासर -माहेरचे लोक समजूतदार असल्यामुळे संसार सुखाचा होतो यात शंकाच नाही. 

परंतु कधी दुर्देवाने, आपल्या मुलीच्या वैवाहिक आयुष्यात जर कोणतीही बिकट समस्या आली, अनपेक्षित असे काही चुकीचे घडले तर मात्र आपण तितक्याच ताकदीने ते स्वीकारून तिला पुन्हा नवीन आयुष्य सुरु करायला मदत करतो का?  तितक्याच उमेदीने आपण परत तिला, तिच्या परिस्थिती ला स्वीकारून आपली पालक म्हणून जबाबदारी पार पडतो का यावर विचार करणे आवश्यक आहे. 

कोणत्याही कारणास्तव  महिला कायमस्वरूपी माहेरी राहायला आलेली असेल अथवा तिला पती पासून घटस्फोट घेऊन वेगळे होण्याशिवाय पर्याय नसेल, किंवा दुर्देवाने तिच्या पतीने निधन झाले असेल, आपण सर्वतोपरी प्रयत्न करून देखील तिच्या आयुष्यात सकारात्मक असे काहीच होऊ शकत नसेल, तर याठिकाणी तिच्या पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.

एकदा लग्न लावून दिल आता पुढे ती आणि तीच नशीब, एकदा घटस्फोट झालाय आता कुठे परत  लग्न लावून द्यायचे?  मुलं बाळ झालीत आता लग्न करणं शोभत नाही, समाज काय म्हणेल, दुसरा पती कसा निघेल?  लोक आम्हाला नाव ठेवतील अशी अनेक कुचकामी कारण मनात धरून, अथवा कोणतीही जोखीम पत्करायची मानसिकता आणि परिस्थिती नसल्यामुळे अनेक ठिकाणी घटस्फोटिता, विधवा,न नांदणाऱ्या महिलांना पालक एकाकी जीवन जगायला भाग पाडतात असे दिसते. 

काही पालक स्वतः च्या मुली कडून, मुलीच्या सासरच्यांकडून आर्थिक मोबदला मिळविणेसाठी, सासरच्या लोकांना मानसिक त्रास देत राहण्यासाठी  कोर्ट केस, पोलीस स्टेशन इत्यादी मध्ये वर्षानुवर्षे घालवून मुलीच्या आयुष्यातील  प्रचंड वेळ वाया घालवतात. तोपर्यंत तरुण वयात घटस्फोट होणार असलेल्या  मुलींना एकाकी खितपत पडत राहावे लागते. काही पालक कितीही त्रास झाला तरी मुलीने सासरीच नांदावे यासाठी आग्रही असतात. काही महिला स्वतः वैवाहिक आयुष्यात समस्या आल्यावर अथवा पतीचे निधन झाल्यावर उर्वरित आयुष्यात एकटे राहण्याचा निर्णय स्वखुशीने घेतात. 

त्यावेळेस या महिलांना, त्यांचे कुटुंबियांना हा निर्णय परिस्थिती नुसार, तिच्या अपत्यांच्या भविष्या नुसार योग्य देखील वाटत असला तरी कोणत्याही कारणास्तव एकटे राहणाऱ्या महिलेला भविष्यात त्रास होऊ शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अश्या महिलांच्या पालकांनी त्यांना मानसिक धीर, आधार देऊन स्वतः पुढाकार घेऊन त्यांचं लवकरात लवकर घर बसविण्यासाठी प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे. 

आपण सातत्याने म्हणतो की पुरुष स्त्री चा गैरफायदा घेतो, त्यातून अश्या परिस्थिती मध्ये सापडलेली स्त्री म्हणजे  त्याच्यासाठी मेजवानीच !! परंतु सर्व दोष पुरुषाला देण कितपत योग्य आहे?  

कोणत्याही समस्येमुळे पती पासून लांब असणाऱ्या अथवा पतीगृही सुखी समाधानी नसणाऱ्या, अथवा वैधव्य आलेल्या  महिलांनी विशेतः त्यांचे पालकांनी वेळेत योग्य निर्णय घेऊन तिचे भविष्यातील आयुष्य मार्गी लावणे महत्वाचे आहे.  अश्या परिस्थिती मधील महिला मुळातच मानसिक दृष्टीने खचलेली असते. असे आयुष्य जगत असतांना त्यांना अनेकदा अनेक आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. वेळोवेळी समाजात वावरताना त्यांना अनेक प्रकारचे लोक भेटतात. अतिशय दुःखद प्रसंगातून गेलेल्या असल्यामुळे अश्या वेळी महिलांना कोणत्याही पुरुषाचा आधार हवासा वाटला तर त्यात वावगे नक्कीच नाही. परंतु खूप दा पुरुषाचा उद्देश फक्त मदत करणे, सहकार्य करणे असा असला तरी काही ठिकाणी महिलाच पुरुषांना विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) ठेवण्यासाठी उत्तेजित करताना असे काही प्रकरणात आढळते. आपल्या स्वतः च्या शारीरिक, मानसिक, आर्थिक सुखासाठी आपण एखाद्याचा संसार तोडणे,आपण स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्री वर अन्याय करणे  कितपत योग्य आहे याचा विचार करणे त्यावेळेस अपेक्षित आहे. 

त्यामुळे पालकांनी देखील या गोष्टी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कधी आपल्या स्वतः च्या मुलीला , आपल्या नात्यातील मुलीला, किंवा परिचयातील कोणत्याही महिलेला  तिच्या प्रापंचिक आयुष्यात काही समस्या आल्यास  पालक म्हणून  ताबडतोब त्यातून मार्ग काढणे, त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे हे त्या महिलेच्या संबंधित मोठया अनुभवी लोकांची जबाबदारी आहे. सदर महिला घटस्फोटिता असल्यास लवकरात लवकर सुयोग्य स्थळ पाहुन लग्न लावून देणे, तिच्या पतीचे दुर्देवाने निधन झाले असल्यास दुसरा विवाह करून देणे, नवऱ्यापासून लांब राहत असल्यास तिला योग्य दिशा दाखवून वेळेत वैवाहिक आयुष्य स्वीकारून वाटचाल करायला सांगणे हे तिच्या घरातील जेष्ठ व्यक्तींनी मनावर घेणे खूप गरजेचे आहे. 

अश्या एकाकी परिस्थिती मधून जाणाऱ्या आणि भावनिक मानसिक पातळीवर एकट्या पडलेल्या महिला, सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळ्या  स्वरूपाचे जीवन जगणाऱ्या महिला कोणत्याही पुरुषाला, त्याच्या अनैतिक मागण्यांना पटकन बळी पडतात. त्यातून त्यांच्या स्वतः च्या आयुष्यातील उमेदीचा काळ, महत्वाची वर्ष निघून जातात, ज्यावेळी त्यांना घरच्यांनी साथ द्यायला हवी ती न मिळाल्यामुळे त्या चुकीच्या मार्गाला लागायची शक्यता जास्त असते. अश्या वेळी समोरील पुरुषाचे संपूर्ण कुटुंब देखील कारण नसताना या प्रकरणात भरडले जाते. 

त्यातूनही पुरुषाला त्याची बायको सामावून आणि सांभाळून घेऊ शकते अनेकदा घेते देखील कारण तिला तिचा संसार टिकवायचा असतो. तिला स्वतः च्या अपत्यांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधातून (Extramarital Affairs) एखादा प्रसंग उद्भवल्यास पुरुषाला फार जास्त त्रास होत नाही. हि परिस्थिती तो कौशल्याने हाताळून नेऊ शकतो. यामध्ये  अनैतिक संबंध ठेवणाऱया महिलांचा मात्र हकनाक बळी जातो. मानहानी, बदनामी, समाजाच्या वाईट नजरा याचा तिला सामना करावा लागतो. 

वास्तविक दुर्देवाने अश्या प्रकारचा कोणताही प्रसंग आपल्यावर ओढवला तर महिलांनी त्यांच्या घरातीत वडील मंडळीना स्वतः च्या भावनिक मानसिक गरजा आणि त्यासाठी आवश्यक असलेला जोडीदार कायदेशीर, नैतिक मार्गाने मिळवण्याची अपेक्षा बोलून दाखवणे योग्य राहील. आपली मुलगी, आपली बहिण, भाची, पुतणी तिच्या आयुष्यातील कोणत्याही अश्या स्वरूपाच्या समस्येमुळे चुकीचा निर्णय तर घेत नाही ना? दुसऱ्या एखादया स्त्रीचा संसार तर उद्वस्त  व्हायला ती कारणीभूत तर होणार नाही ना?  तिच्या काही  गरजा पूर्ण करण्यासाठी, तिच्या मुलांचा आधार शोधण्यासाठी,  ती कळत नकळत दुसऱ्याच घर तर मोडत नाही ना याचा विचार जेष्ठ मंडळींनी करून त्यावर ताबडतोब सुयोग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. 

असे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) काही वर्षासाठी जरी गोड वाटले,तरी हे संबंध शाश्वत सत्य नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात पूर्ण पणे एकाकी जगण्याची वेळ येईल, पश्चाताप शिवाय पदरात काहीच पडणार नाही, वेळप्रसंगी मोठी मानहानी सोसावी लागेल. प्रेमाच्या, भावनेच्या नावाखाली अस्तित्वात आलेलं असं नातं, त्याची धुंदी कालांतराने उतरल्यावर लक्षात येतें की, समाजात अश्या नात्याला कोणतंही नाव आणि मान्यता मिळत नसते. अनेकदा कुटुंबातील, नात्यातील काही पुरुष सुद्धा अश्या एकट्या पडलेल्या महिलांचा गैरफायदा घ्यायला कमी करत नाहीत. 

अश्या कोणत्याही घटना पीडितेने  घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळेत लक्षात आणून द्याव्या असे वाटते. घरातल्या लोकांनी देखील बघ्याची भूमिका न घेता  त्यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावं.

अश्या पीडित महिलांनी, अथवा स्वतः ओढवलेल्या परिस्तिथी मुळे पर पुरुषाकडे आकर्षित होताना नैतिक भान जपणे महत्वाचे आहे.  पुरुषांच्या भूल थापांना, स्वतः च कुटुंब आरामात सांभाळून तुमच्यावर प्रेम दाखवणाऱ्या  देवदास आणि मजनूंना,  त्यांच्या करमणुकीसाठी तुमचा वापर करू देऊ नका.  परक्या पुरुषावर विश्वास ठेऊन आपलं सर्वस्व बहाल करण्यापेक्षा, आपल्या आई वडिलांना, जेष्ठ माणसांना विश्वासात घेऊन आपलं मन मोकळ करा. ते रागावतील, चिडतील, वैतागतील परंतु योग्य मार्ग देखील तेच दाखवतील.

अनेक ठिकाणी महिलांना विवाह विषयक कायदे माहिती नाहीत. अश्या महिलांनी  एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करताना कोणताही  कायदेशीर सल्ला घेतलेला नसतो. सिनेमात दाखवल्यानुसार मंदिरात लग्न लावणारा, खोटी, नकली कागदपत्रे बनवून महिलेला आपलं नाव वापरू देणारा,मी कोणाला घाबरत नाही, मी तुझ्या साठी काहीही करू शकतो असे डायलॉग मारणारा,  कोणत्याही महिलेसोबत बिनभोभाट विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) ठेऊन समाजाला कुटुंबियांना फाट्यावर मारणारा, बायको च्या बरोबरीने तिला स्थान देऊ करणारा पुरुष त्यांच्या आयुष्यातील जणू हिरो च असतो. 

यावेळी त्याच्या आयुष्याबद्दल त्याने किती खरी माहिती आपल्यापासून लपवली आहे, तो जे दाखवतोय ते सत्य आहे का याचा शहानिशा महिला कधीच करत नाहीत.महिलांनी हा भावनांचा खेळ समजून घेणे आवश्यक असते.आपला वापर पत्त्यांच्या खेळामधील पत्त्या नुसार अथवा बुद्धिबळातील सोंगट्या सारखं गरजेनुसार वापरणारा पुरुष असले नाते संबंध कधीही कायदेशीर होऊ देत नाही आणि जरी त्याने तशी तयारी दाखवली तरी त्याची पत्नी ते होऊ देत नाही.कोणत्याही विवाहबाह्य संबंधात अडकण्या आधीच सत्य समजावून घेऊन ते स्वीकारणे आवश्यक आहे. 

महिलांनी तसेच त्यांच्या संपर्कातील जेष्ठ व्यक्तींनी संबंधित महिलेच अस्तित्व, तिचा  मान, तिचा आत्मसन्मान जिथे कायमस्वरूपी मिळू शकतो अशाच ठिकाणी म्हणजेच योग्य मार्गाने विवाह करून कायमस्वरूपी घरोबा बसविण्यासाठी मार्गदर्शन करावे.अनेक ठिकाणी घटस्फोट झाल्यानंतर, पतीचे निधन झाल्यानंतर अथवा संबंधित महिलेने पती सोबत नांदण्यास नकार दिल्या नंतर त्यांचे पालक त्यांना स्वतः च्या पायावर उभ राहा, कमावती हो, मुलांवर लक्ष दे, खंबीर हो, आम्ही आहोत, जे आहे ते तुझंच आहे असे सर्व प्रकारचे सल्ले देतात. आम्ही आहोत तूझ्या पाठीशी, कालांतराने तुझी मुलं मोठी होतील, तेच आता तूझ्या आयुष्याचा आधार आहेत, त्यांच्या कडे बघून जगायचं. त्याचप्रमाणे हे काय वय आहे का परत लग्न करायचं ?अशी मत मांडताना दिसतात.  

उभ आयुष्य हि महिला शारीरिक, मानसिक, भावनिक  गरजांचा त्याग करून कशी राहील? तिला एकाकी जीवन जगताना  मोहात टाकणारे प्रसंग कधीच येणार नाहीत का? आले तर ती त्या ठिकाणी नीतिमत्ता शाबूत ठेऊ शकेल का? याचा वडीलधाऱ्यानी विचार करावा. कारण आपण आज तिला बाकी सर्व सल्ले देतांना, तिला बाकी सर्व प्रकारची मदत करताना तिच्या मनाचा तिच्या शारीरिक अपेक्षांचा अजिबात विचार केलेला नसतो. अश्या महिलांच्या आयुष्यात जेव्हा कधी कोणताही पुरुष येतो आणि त्यांच्या आयुष्यातील हि कमी तो भरून काढतो तेव्हा त्याच्या प्रपंचाला धक्का लागतो, त्याच्या पत्नी च्या विश्वासाला तडा जात असतो. म्हणजेच अप्रत्यक्ष रित्या हि महिला या विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affairs) कारणीभूत ठरलेली असते.याठिकाणी जर तिच्या पालकांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले, तिच्या सर्व गरजा मानसिकता लक्षात घेऊन तिला नैतिक मार्गाने जोडीदार मिळविण्यासाठी प्रयत्न केलें तर नक्कीच दुसऱ्याचे संसार वाचतील यात शंका नाही.

अनेक ठिकाणी पीडित महिलेच्या पालकांची उदासीन भूमिका, कुटुंबियांनी त्यांचे कडे केलेलं दुर्लक्ष, एक लग्न मोडल्यावर किंवा पती चे निधन झाल्यावर तिच्या कडून आयुष्यभर त्यागाची अपेक्षा करण, किंवा तिला बाहेर जे करायचं ते करू दे म्हणून स्वतः ला सोईस्कर रित्या अलिप्त ठेवणं, किंवा बिचारी मजबूर आहे काय करणार म्हणून तिने चुकीचा मार्गाने प्रस्तापित केलेल्या संबंधांना दुजोरा देण हे कदापि योग्य नाही.

अनेक ठिकाणी अविवाहित तरुणी, महाविद्यालयीन मुली देखील विवाहित पुरुषाकडे आकर्षित होताना ची उदाहरणे देखील कधी तरी बघायला मिळतात.आपल्या आयुष्याच्या ज्या वळणावर प्रत्येक पाऊल जपून टाकणे आवश्यक आहे अश्या वयात प्रेम नावाच्या आभासी दुनियेत वावरणाऱ्या या मुली विवाहित असलेल्या,पत्नी आणि अपत्य असलेल्या पुरुषाच्या आयुष्यात कोणत्या उद्देशाने येतात आणि काय मिळवतात ? 

आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला, विवाहित पुरुष त्यांना आवडावा किंवा त्याच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची स्वप्न त्यांनी पाहावीत किंवा तसें प्रयत्न करावेत  यात एक टक्का सुद्धा अर्थ नसतो. याठिकाणी देखील अश्या प्रकारे स्वतः च आयुष्य स्वतःच्या हाताने बरबाद करणाऱ्या युवतींच्या पालकांची भूमिका अतिशय निर्णयात्मक असणे आवश्यक आहे.आपल्याशी लग्न करू शकणाऱ्या, आपल्याला योग्य अश्या मुलाशी प्रेम अथवा प्रेमविवाह करणे गैर नक्कीच नाही पण एखाद्या अविवाहित युवतीने विवाहित पुरुषाच्या मागण्यांना दुजोरा देणे त्याच्या वैवाहिक आयुष्यात येऊन त्याच कुटुंब उध्वस्त होण्यासाठी कारणीभूत होणे आणि हे सर्व होत असताना या मुलीच्या पालकांनी कठोर भूमिका न घेणे अतिशय चुकीचं आहे.

विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affairs) पूर्णतः फक्त पुरुषच किंवा महिलाच जबाबदार आहेत असे म्हणणे नक्कीच रास्त नाही. महिलांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे परिचित, नातेवाईक त्यांच्या मित्र मैत्रिणी यांनी देखील त्यांना वेळीच योग्य मार्ग दाखवणे, योग्य सल्ले देणे अपेक्षित आहे. जेव्हा कोणतीही विवाहित स्त्री, पती च्या घरी नांदत असतांना जरी चुकीचे संबंध प्रस्तापित करीत असेल तर पती सोबतच तिच्या संबंधातील इतरांनी देखील तिच्या नेमक्या अडचणी, भावना, अपेक्षा समजावून घेऊन तिला परावृत्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. अनेकदा अश्या महिलांचे पालक त्यांच्या चुकांवर पांघरून घालतात आणि तिच्या अश्या वागण्याचा दोष तिच्या पतीला देऊन स्वतः ची जबाबदारी झटकतात. यामध्ये अनेकदा सज्जन सभ्य आणि प्रामाणिक पणे संसार करणारे पुरुष, पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे पुरुष भरडले जातात. असे पाहण्यात येते. 

अश्या अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या कडून अथवा त्यांच्या पालकांकडून भूतकाळात झालेल्या चुकांमुळे  भरकटलेले आयुष्य वर्षानुवर्षे जगत आहेत.  विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) ज्या पुरुषाशी आहेत त्याच्या कडून अवास्तव अपेक्षा ठेऊन, वेळप्रसंगी त्याला ब्लॅकमेल करून, धमक्या देऊन, स्वतः च्या घरच्यांना अंधारात ठेऊन या  स्वतःचीच फसवणूक करणाऱ्या महिलाना  देखील आपण समुपदेशन करीत आहेत. काही ठिकाणी स्वतः च्या आयुष्यात आलेले अप्रिय प्रसंगांना त्या हिमतीने तोंड देऊ शकत नाहीत. या एकाकी आयुष्य जगणाऱ्या महिला स्वतः च्या कुटुंबियांना देखील खूपदा गप्प करतात. घरातल्यानीच नीट स्थळ बघितलं नाही,  माझ्या आयुष्यच वाटोळं केल् असा  दोष देताना देखील महिला दिसून येतें. 

अश्या वेळी घरातील सदस्य सुद्धा हतबल होतात. कोणत्याही अनैतिक वागणुकीचा महिलेला घरातून जाब विचारला गेला तर या महिला अथवा युवती मोठया आत्मविश्वास पूर्वक आपल्या चुकांचं समर्थन करताना दिसतात. स्वतः ची खोटी समजूत घालणाऱ्या, कमकुवत बुद्धीच्या काही महिला, स्वतः च्या घरातल्या व्यक्तींना त्यांनी तिच्या अश्या अनैतिक  प्रेमप्रकरणावर आक्षेप घेतल्यास सांगत असतात की, त्याचा घटस्फोट होणार आहे, तो माझ्या साठी घटस्फोट घेणार आहे, त्याची कोर्टात केस सुरु आहे, त्याची बायको त्याला  सोडून गेलेली आहे, त्याची बायको नांदत नाही, त्याची बायको त्याला आवडत नाही, तो तिच्यापासून सुखी नाही, तिच्यासोबत त्याला राहायचं नाही  म्हणून  तो माझ्याशी लग्न करणार आहे.  स्वतः च्या मनाची अशी खोटी समजूत घालत या महिला आपल्या घरातल्या सदस्यांना पण अनेक काळ फसवत राहतात आणि कालांतराने त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटून त्या अतिशय उद्वीग्न होतात. 

वास्तविक वर नमूद केलेल्या दुसऱ्याच्या घरातील कोणत्याही समस्येशी, अथवा त्या पती पत्नी मधील कोणत्याही विषयात लक्ष घालण्याचा आपल्याला  एक परकी स्त्री म्हणून कोणताही अधिकार नाही,  दुसऱ्याच्या कुटुंबातील कोणतीही सूत्र आपण हाताळू शकत नाही, हे लक्षात असणे आवश्यक असते. त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत काहीही चुकीचं असलं तरी त्याठिकाणी हस्तक्षेप करण्याचा आपल्याला कोणताही नैतिक कायदेशीर हक्क नाही हे आवर्जून लक्षात घेणे योग्य राहील. 

अश्या वेळी त्यांच्या शी आपला काहीही संबंध नाही, आणि त्यांचं ते बघून घेतील. तू तूझ्या आयुष्याचा बघ असं खडसावून सांगणारे पालक आणि वेळीच वास्तववादी निर्णय घेणारे पालक या ठिकाणी आवश्यक असतात.

आपली जबाबदारी जर परस्पर एखादा माणूस पूर्ण करीत असेल तर हे पालक सोईस्कर पणे अश्या घटनांना विरोध करणे टाळतात.अशा काही घटना घडल्या आहेत.  विवाहित पुरुषाच्या संसारात स्वतः ची जागा निर्माण करून, त्याच्या पत्नीचे अधिकार हिसकावून, त्याच्या  कमाईचा, मालमत्ते चा उपभोग घ्यायला,विवाहित पुरुषाच्या मागे लागून त्याचा आर्थिक लाभ करून घ्यायला देखील अश्या मनोवृत्ती च्या महिलांना त्यांच्याच घरचे पाठिंबा देतात आणि विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affairs) खतपाणी घातलं जात. या स्वरूपाच्या अनेक घटना समाजात राजरोस घडत आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) रोखण्यासाठी महिलांच्या घरातल्या आप्तांची भूमिका अतिशय निर्णायक आणि खंबीर असणे आवश्यक आहे.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ,मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 

संपर्क. 9834114342 

9766863443

(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत)