सर्वात वर

विवाहबाह्य संबंधात चूक कोणाची ? 

सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे

विवाहबाह्य(Extramarital Affair) संबंध कशाप्रकारे पती आणि पत्नी दोघांसाठी घातक असतात आणि त्याचा वैवाहिक आणि सहजीवनावर तसेच संपूर्ण कुटुंबावर किती वाईट परिणाम होतो यावर आपण आपल्या लेखामधून सातत्याने प्रकाशझोत टाकत आहोत. विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affair) फक्त पती किंवा पत्नीचं जबाबदार असते असे नाही तर पतीचे कुटुंबीय अथवा पत्नीचे कुटुंबीय देखील अनेकदा तितकेच कारणीभूत असतात. या लेखात आपण विवाहित पुरुषाच्या विवाहबाह्य (Extramarital Affair) संबंधांमध्ये त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे विचार, त्यांचा दृष्टीकोन, त्यांनी घेतलेले निर्णय किती महत्वाचे असतात यावर चर्चा करणार आहोत. 

पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात काहीनाकाही कुरबुरी, रुसवे फुगवे, तक्रारी, गैरसमज असणे स्वाभाविक आहे. यातून त्या दोघांनी परस्पर सामंजस्याने वाटचाल करणे अभिप्रेत असते. आपल्याकडे अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. सासू, सासरे, नणंद, जावा, दीर तसेच इतर नातेवाईक, शेजारी, कुटुंबियांचे मित्र मंडळी, सहकारी या सगळ्यांना धरून, स्नेहभाव ठेऊन वैवाहिक जीवनाची वाटचाल अजून आनंददायी होते यात शंकाच नाही. परंतु अनेकदा समाजात असे चित्र पाहायला मिळते की हेच आप्तस्वकीय नवरा बायकोच्या वैवाहिक आयुष्यातिल छोट्या छोटया बाबींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करीत राहतात. वेळप्रसंगी आपल्या घरातील सुनेची चारचौघात बदनामी करणे, तिला तिच्या माहेरच्यांना नाव ठेवत राहणे, सातत्याने टोमणे मारणे, घालून पाडून बोलणे, अपमानित करणे यासारख्या वागणुकीमुळे आपणच आपल्या भावाच्या, मुलाच्या संसारात विष कालवतोय हे त्यांच्या ध्यानी मनी पण नसते.

आपल्याच घरातील माणसाची मग ती सून असो, अथवा जावई असो आपल्याच तोंडाने जेव्हा आपण निंदा करतो, त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या चुका जेव्हा कुटुंबातील लोकच चव्हाट्यावर आणतात तेव्हा या परिस्थिती चा गैरफायदा घ्यायला समाजातील अनेक विकृत मानसिकता असलेले स्त्री आणि पुरुष तयारच असतात. पुरुषच नेहमी महिलांचा गैरफायदा घेतात असे नसून अनेकदा विवाहित पुरुषांचा स्वतः च्या स्वार्थासाठी गैरफायदा घेणाऱ्या महिला देखील आपल्या समाजात आहेत. 

आपल्या घरातील व्यक्तीला चांगल्या वाईट परिस्तिथी मध्ये समजावून घेणे, सांभाळून घेणे, त्याच्या चुकांवर त्यांना योग्य सल्ले देणे, कुटुंबात गैरसमज निर्माण होणार नाही, कोणीही दुखावलं जाणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेणे कुटुंबातील सर्वांचे कर्तव्य आहे. घरातील समस्या, प्रश्न, वादविवाद घरातच मिटले तर कुटुंब व्यवस्था अधिक बळकट होईल यात शंकाच नाही. 

आपल्या घरातील पुरुष जेव्हा विवाहबाह्य (Extramarital Affair) संबंध प्रस्तापित करतो किंवा त्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा त्याच्या बायकोलाच दोष देऊन त्याची पाठराखण करताना कुटुंबातील अनेक जण दिसतात असे चित्रही कधी कधी बघायला मिळते.

आपण जेव्हा आपल्या कुटुंबातील सुनेला योग्य तो मान सन्मान, न्याय देऊ शकत नाही अथवा तिला योग्य अशी वागणूक सासरी मिळत नाही, किंवा सासरच्या लोकांमध्ये आणि तिच्या मध्ये मतभेद होत असतात, सहसा तेव्हा पुरुष या कटकटींना वैतागून विवाहबाह्य संबंधांकडे ओढला जातो.पुरुषाचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) निर्माण होण्यामागील अनेक कारणांमधील हे एक महत्वाचे कारण आहे. 

त्यातूनही जर पत्नी ने अश्या संबंधांना (Extramarital Affair) विरोध केला,अथवा तिला या संबंधामुळे होत असलेला त्रास सासरच्या लोकांना सांगितला तर तिला कोणीही गांभीर्याने घेत नाही. उलटपक्षी तीच कशी संसार सांभाळायला, नवरा ताब्यात ठेवायला कमी पडली यावरून तिला सुनावले जाते. ज्यावेळी पती विवाहबाह्य संबंध प्रस्तापित करतो तेव्हा त्याची आई, वडील, भाऊ, बहिणी यांच्या पेक्षाही पत्नी ला हि जाणीव सर्वप्रथम होते. अश्यावेळी सासरच्यांनी तिच्या मागे खंबीर उभे राहणे, तिला साथ देणे, स्वतः चा मुलगा, भाऊ, मित्र  याला तो चुकला आहे आणि या चुकीचे किती विपरीत परिणाम त्याच्या संसारावर होतील, त्याच्या पत्नीला, मुलांना किती यातना सहन कराव्या लागतील हे लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक असते.

समुपदेशन साठी आलेल्या काही महिलांनी त्यांच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधा (Extramarital Affair) बद्दल चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलें. अनेकदा पती च्या घरातील मंडळीना अश्या संबंधाबाबतीत (Extramarital Affair) माहिती असते. अनेकदा विवाहापूर्वीच असलेली त्याची प्रेमप्रकरणे  देखील त्याच्या घरात माहिती असतात.तरी पत्नी ने खूपदा सासरच्या लोकांना याबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न केलेला असतो, अनेकदा हाती लागलेले मेसेज, फोटो, फोन कॉल डिटेल, भेटवस्तू इत्यादी पुरावे देखील महिला सासरच्यांना दाखवतात तरीही त्यांना खोटं ठरविण्यात येतें. तस काही नसेल, त्याला सवय आहे सगळ्यांशी मनमोकळे बोलण्याची, भोळा आहे तो, त्याच्या मनात असं काहीच नसत, आपल्या घरातील पुरुष असं करूच शकत नाही, तू संशयी आहेस, तू त्याच प्रेम ओळखू शकली नाहीस, तुला त्याच्यात खोड काढ्याची सवयच आहे किंवा तू आमच्या खानदानाला बदनाम करण्यासाठी असे आरोप करते या गोष्टी विवाहितांना ऐकून घ्याव्या लागतात. 

पती आपल्यापासून मनाने, शरीराने दूर जातो आहे किंवा आपल्याला टाळतो आहे किंवा त्याच्या वागणुकीत बदल झाला आहे हे कोणतीही पत्नी ताबडतोब समजू शकते. सासरचे मात्र तूझ्या शी तो जवळीक करीत नसेल तरी शारीरिक सुख म्हणजेच संसार नाही, परक्या स्त्रीशी फ्री वागणं म्हणजे लफड नाही, कामानिमित्त इतर महिलांशी कामानिमित्त बोलण, भेटणं,बाहेरगावी जाण म्हणजे काही विश्वासघात नाही असे सांगून तिची समजूत काढली जाते. 

काही महाभाग तर आजकाल सर्रास सगळेच पुरुष विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) ठेवतात त्यात काही गैर नाही असं समर्थन देखील करताना दिसतात. एखाद प्रकरण उघडकीस आल तरी त्या महिलेनेच याला फसवलं, तीच याच्या मागे लागली होती, तिचाच स्वार्थ होता असे बोलून तिच्या चारित्र्यावर देखील हि मंडळी आपली मत मांडताना दिसतात. पण आपल्या घरातील पुरुषाची पण तितकीच चूक या प्रकरणात आहे हे पचवणे त्यांना जड जाते. 

याठिकाणी पती आपल्या घरच्यांना इमोशनल ब्लॅक मेल करून तो कसा बायकोपासून सुखी नाही, ती कशी चुकीची आहे,  ती त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडते, हे दाखवून राजरोस पणे स्वतः चे अनैतिक संबंध (Extramarital Affair) सुरु ठेवतो ते हि काही उदाहरणे बघायला मिळतात. 

अनेक ठिकाणी घरातील हिच एक व्यक्ती कर्ता पुरुष किंवा कमवणारी असल्यामुळे सर्व कुटुंब त्याचेवर आर्थिक बाबतीत अवलंबून असते. अश्यावेळी या व्यक्तीच्या संसारापेक्षा आणि त्याच्या बायको मुलांपेक्षा पैसा महत्वाचा असतो. त्यामुळे कोणीही महिलेच्या बाजूने उभे राहून अश्या चुकीच्या संबंधांना विरोध करत नाही. 

अनेक महिलांकडून असे समजले की त्यांचा नवरा चोरून लपून कोणाला भेटतोय, कुठे जातोय किंवा पत्नीच्या  अनुपस्थित कोणाला घरी आणतोय याबाबत पूर्ण कल्पना सासरच्या लोकांना असून देखील ते मूग गिळून गप्प बसतात.
अनेकदा सासरच्या मंडळींनी वेळच्यावेळी अश्या प्रकरणांना आळा नं घातल्यामुळे हे विवाहबाह्य संबंध घराच्या आत  येऊन पोहचतात. याठिकाणी सर्व दोष पत्नीलाच दिला जातो असे जाणवते. आपला मुलगा जर पती म्हणून चुकत असेल तर वेळीच त्याच्या अश्या सवयीना कंट्रोल करणे, वैवाहिक जीवनाचे महत्व, जबाबदारी पटवून देणे, त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणे हे काम सासरच्यांनी पुढे होऊन करणे आवश्यक आहे. 

सासरच्या लोकांची अपेक्षा असते की आपण जसे त्याचे हे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) स्वीकारले आहेत किंवा त्याकडे कानाडोळा केला आहे तसेच त्याच्या पत्नी ने सुद्धा ते स्वीकारून त्याचे सोबत तक्रार नं करता संसार करावा. 

कोणतीही पत्नी आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्री सोबत पाहू शकत नाही हे जगातलं शास्वत सत्य असते. विवाहबाह्य संबंधात (Extramarital Affair) अडकलेला पती तर अश्यावेळी पत्नी ला जुमानायला किंवा तिच्या साठी बाहेरचे रिलेशन तोडायला अजिबात तयार नसतो. अश्यावेळी पत्नी ला जर सासरच्या नातेवाईकांकडून योग्य असे पाठबळ मिळाले, धीर मिळाला, सहकार्य मिळाले तरच ती या प्रसंगाला तोंड देऊ शकते.अन्यथा फारकत घेणे, पती पासून विभक्त राहणे, मुलांना घेऊन माहेरी निघून जाणे यासारखे मार्ग तिला स्वीकारावे लागतात. असे मार्ग स्वीकारून सुद्धा सासरचे लोक आपल्या मुलाचा, भावाचा संसार सावरायला पुढे येत नाहीत. 

अनेक ठिकाणी पत्नी अश्या वेळी एकटी पडते त्यावेळेस जो योग्य वाटेल तो निर्णय घेऊन मोकळी होते. यामध्ये पतीच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या महिलेच नुकसान तर होतंच पण एक संसार देखील कायमस्वरूपी उध्वस्त होतो. पत्नी स्वतः जेव्हा पतीच्या अनैतिक संबंधांना (Extramarital Affair) आवर घालू शकत नाही तेव्हा पतीच्या घरच्या इतर सदस्यांची भूमिका खूप महत्वाची असते. पत्नी च्या अनुपस्थिती मध्ये पतीला आणि पती सोबत संबंध (Extramarital Affair) जोडलेल्या महिलेला आवरणे हि सगळ्यांची जबाबदारी असते. पण सासरी  असलेल्या नात्यांमधील कोणालाच वाईटपणा घ्यायचा नसतो.  प्रत्येकाला  वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याच्या संसाराचा बळी गेला तरी काहीच फरक पडणार नसतो. 

अश्या वेळी या व्यक्ती च्या आयुष्यात बेकायदेशीर रित्या आलेल्या स्त्री ची हिम्मत वाढणे, तिने या व्यक्तीच्या पत्नी ची जागा घेण्याचा प्रयत्न करणे, स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी, स्वतः च्या ऐहिक सुखासाठी, मिळणाऱ्या मोबदल्याची प्रयत्न करणे सुरु होते. अश्या वेळी केवळ पत्नीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचे होणारे आर्थिक नुकसान, अधोगती, सामाजिक बदनामी वेळीच थांबवणे सर्व कुटुंबाची जबाबदारी असते.

एकुलता एक मुलगा, घराण्याचा वारस, एकुलता एक भाऊ, कुटुंबाचा आधारस्तंभ,  कमावता, कर्ता, शून्यातून पुढे आलेला अश्या प्रकारच्या भूमिका साकारणारा पुरुष जेव्हा वैवाहिक जीवनाला तडा जाणारी कोणतीही चूक करतो तेव्हा त्याला जाब विचारणार त्याच्या च घरात कोणीच नसत. अश्या कुटुंबात पुरुषाचा मनमानी  कारभार, कोणाचाही धाक, दबाव नं बाळगणे, पत्नी ला सातत्याने खोटं ठरविणे यासाठीच सर्वजण एक होतात आणि संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य उध्वस्त होताना दिसत.

त्यामुळे मुलाचं लग्न लावून दिल आता त्याला सांभाळणं, त्याला सुधरवण, त्याला ताब्यात ठेवणं फक्त बायकोचीच जबाबदारी आहे असे म्हणणारी माणसे देखील समाजात आहेत. याचा अर्थ लग्नाआधी तो बिघडलेला च होता का?  लग्न होई पर्यंत तुम्ही त्याला ताब्यात ठेऊ शकला नाहीत का? विवाहानंतर तो वाईट वळणाला गेला यात तुमच्या संस्कारांची कमतरता नाही का?  लहानपणापासून तुम्ही त्याच्या चुकीच्या सवयीना पाठीशी घातलं याचा त्रास विवाह करून आलेल्या त्याच्या पत्नीला भोगावा लागतोय का? त्यामुळेच जर त्याच्या वैवाहिक आयुष्यात कोणतीही समस्या आली तर त्याला बायकोच जबाबदार आहे अशी बघ्याची भूमिका नं घेता, आपल्या नैतिक जबाबदाऱ्या झटकून पतीच्या कुटुंबीयांनी आमचा नाईलाज आहे, आमची मजबुरी आहे, आमच्या हातात काहीच नाही,  म्हणत बसण्यापेक्षा संसार जोडायचा प्रयत्न केला तर नक्कीच विवाहबाह्य संबंधांना (Extramarital Affair) आळा बसायला मदत होईल. 

सासरच्या लोकांसाठी जसा त्यांच्या घरातील पुरुष त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांचा म्हातारपणाचा आधार, माहेरपण पुरवणारा लाडका भाऊ असतो तसंच घरात सून म्हणून आलेली स्त्री देखील कोणाची तरी लाडात कौतुकात वाढलेली मुलगी असते. ज्यावेळी पती पत्नी च्या नात्यात कोणतीही त्रयस्त महिला प्रवेश करते तेव्हाच ती भविष्यातील मोठया संकटाची चाहूल असते. समुपदेशन मध्ये अशी प्रकरण हाताळताना खूपदा हे लक्षात येतें की, ज्या महिला अविवाहित आहेत, एकट्या आहेत, घटस्फोटिता अथवा विधवा आहेत त्यांनी कोणाचाही संसार मोडताना, किंवा कुठल्याही वैवाहिक पुरुषाच्या आयुष्यात प्रवेश करताना हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे. 

दुर्देवाने या महिला योग्य मार्गाने स्वतः च्या आयुष्यात जोडीदार शोधून त्याच्यासोबत सेटल होण्याऐवजी शॉर्टकट निवडताना दिसतात.  स्वतः च आयुष्य वेळीच सावरून स्वतः च बस्तान बसवू नं शकल्यामुळे, वेळीच योग्य निर्णय घेता नं आल्यामुळे, आर्थिक फायद्यासाठी, मौजमजेसाठी  किंवा कोणीही विचारणार नसल्याने, स्वछंदी जीवन जगण्याच्या प्रयत्नात इतरांचा सुखी संसार बरबाद करतात.  कोणाच्याही संसारात घुसून त्याच्या बायकोची जागा हिसकावून घेण्यापेक्षा जर अश्या महिलांनी स्वतः च आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नक्कीच यश येईल. असेही त्यांनी निवडलेला हा चुकीचा रस्ता त्यांना कालांतराने चुकीच्याच ठिकाणी घेऊन जाणार असतो. पण त्यामध्ये विनाकारण कोणाचा संसार बिघडतो, कोणाची मुलं बाळ आपल्यामुळे  दुरावतात याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

जरी घरातील पती अथवा पत्नी कोणीही चुकत असेल, वेगळ्या मार्गाला जात असेल तर अश्या मानसिकतेच्या महिला या परिस्तिथी चा गैरफायदा घ्यायला सदैव तत्पर असतात.  याठिकाणी घरातील वडील धाऱ्या, जेष्ठ, मोठया, जाणत्या आणि अनुभवी लोकांनी वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणली तर पुढील अनर्थ नक्कीच टाळता येतात. अनेक कुटुंबामध्ये पतीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) स्वीकारून, त्याच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या स्त्री सोबत हातमिळवणी करून त्याच्या कायदेशीर पत्नी वर च अन्याय करणारे, तीच मानसिक खच्चीकरण करून तिलाच खलनायक ठरवणारे आणि स्वतः च्या चुकांचं समर्थन करणारे कुटुंबातील सदस्य देखील पाहायला मिळतात.

Meenakshi Krishnaji Jagdale
सौ.मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे

संपर्क. 9834114342 

9766863443

(लेखिका पत्रकार, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत)