सर्वात वर

पिकलेलं पान

पल्लवी पटवर्धन

चेह-यावरच्या सुरकुत्या मुखवट्यांपेक्षा खुप आपल्या असतात…
ते तजेलदार चेहरे हवेहवेसे, आधारातुन शांत करणारे हात…

काही माणसं ,काही नाती हे शब्दाच्या व्याख्येत बसत नाही, त्याची व्यापकता मोजता येत नाही..

असंच काहीसं मनातलं, काही कल्पनेतलं…..

आता तिच्या हाती वॉकर आला होता.. आणि त्याच्या हाती काठी…

ती म्हणायची ह्या  वडाच्या झाडाचं आणि माझं वय सारखंच बरं का…

तो म्हणायचा हे घर आणि माझ्या जन्मवेळ्या जवळपास सारख्याच आईच्या गर्भात होतो तेव्हापासूनचं आमचं नातं…

ती म्हणाली,आता पाने गळतात त्याची, पिकलीत ना म्हणून कारण प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो..

मला ती नेहमी म्हणायची … प्रत्येकाचा एक काळ असतो जगण्याच्या उमेदीचा… 

पानातलं लोणचं जेवणाचा आनंद वाढवतं ना तशी ती आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातली उर्जा वाढवत होती…

त्याचंही तसंच होतं आनंद वाटत फिरायचा तो अविरत..

तो म्हणाला मला निर्जीव वस्तूंचही तसंच असतं जसे ते जुने होतील तशा त्या हळूहळू बंद पडतात मग माणसं त्या वस्तु रिप्लेस करतात.. पण माणसाचा तसं नसतं ती रिप्लेस करता नाही येत..

फक्त त्यांना नात्यात ओलाव्याची गरज असते कारण तो बंद घट्ट करत असतो… आपल्या घराचंही तसचं असतं कि जितके तडे आणि चिरा पडत जातात तितकं त्या घरानंही सोसलेलंच असतं…

माणसाचं हि तसचं असतं त्याचही वय पिकत जातं.. आचारांनी, विचारांनी, देहाने..

मग ते परिपक्व होतं…

काही पदार्थ मुरल्यानंतर आपल्या जिभेला आनंद देतो तसचं वयं मुरलेली माणसंही आपल्या जगण्यात आनंदच भरत असतात , त्यांच्या अनुभवातुन, विचारांच्या ऊंचीतुन.. 

शरीर जरी झुकत गेलं वार्धक्याने तरी उमेद तितकीच तरुण असते ह्या सुरकुतलेल्या तरुणांची…

पानं पिकली कि त्यांना स्पर्श करताच उन्मळुन पडतात त्याची जीवनगाथा तिथेच संपत नसते …  ते परत रुजतात परत अंकुरतात… माणसाचं हि तसचं असतं एखाद्या बळकट झाडाप्रमाणे, कारण 

घट्ट पाय रोवुन उभा असलेला तो वटवृक्ष जपणुक करत असतो … भावनेतल्या जाणिवेची , वेदनांचा निचरा करत , फुलवत असतो आपल्याला..

तो म्हणाला मी पुसत गेलो ते कोपरे जे फक्त अंधाराने भरलेले होते… मग शोधत राहिलो उन्हाचे कवडसे माझ्या उमलणा-या गात्रातुन…

ती म्हणाली सावलीतनं ही नात्यांचे हि चटके सोसत सोसत फुंकर घालतच होतो आम्ही…

अश्या अगम्य वाटा आयुष्यात तुम्हाला खुणावत असतात ज्या कधी भरीव वाटतात,तर कधी भरीव असतांना ही पोकळ असातात…

मग कधी हि पानं हि थकतात जीवन यात्रेतुन , मग निपचीत पडतात .. पण हास्य देऊन जातात , त्यात खुप काही दडलेलं असतं जे आपल्याला शोधायचं असतं.,.

आज ही पानं जरी उडुन गेली तरी संस्कारांची भलीमोठी शिदोरी आपल्याला देऊन जातात जतन करायला… हि अशी अविट गोडीची फळं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात एका ऊर्जीत तृप्तीसाठी..

Pallavi-P-Patwardhan
पल्लवी पटवर्धन